संजय तिपाले
गडचिरोली : अजित पवार यांच्यासमवेत भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्या सत्तेत सामील झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व आदिवासींचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली.
त्यामुळे अहेरीतील आत्राम परिवाराच्या राजसत्तेचा रुतबा पुन्हा एकदा पहायला मिळाला आहे. विशेष म्हणजे धर्मरावबाबा जेव्हा जेव्हा आमदार म्हणून विधानसभेत गेले तेव्हा तेव्हा आमदार झाले. आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण व्हायला वर्षभराचा अवधी शिल्लक असताना थेट कॅबिनेट मंत्री होऊन त्यांनी मिस्टर मिनिस्टर ही परंपराही अबाधित राखली.
ग्रामपंचायत सदस्य ते राज्याचे कॅबिनेट मंत्री असा धर्मरावबाबा यांचा विस्मयकारक राजकीय प्रवास आहे. अहेरीच्या आत्राम राजघराण्यातून आलेल्या धर्मरावबाबा यांनी १९७५ मध्ये अहेरी ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर १९८० मध्ये पंचायत समिती सभापतिपदी विराजमान झाले. त्यांनी ५० वर्षांच्या राजकीय प्रवासात सात वेळा विधानसभा निवडणूक लढवली, चारवेळा ते विजयी झाले, तर तीनवेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
राजकीय चढ- उताराची कारकीर्द, गाजले अपहरण प्रकरण
धर्मरावबाबा १९९० मध्ये पूर्वीच्या सिरोंचा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले. १९९५ मध्ये बंधू राजे सत्यवानराव आत्राम यांनी त्यांचा पराभव केला. पुढे १९९९ मध्ये गोंडवाना गणतंत्र पार्टीकडून नशिब आजमावत त्यांचा अवघ्या ३७५ मतांनी विजय झाला. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते विधानसभेत पोहोचले. २००९ मध्ये आदिवासी विद्यार्थी काँग्रेसचे दीपक आत्राम व २०१४ मध्ये पुतणे अंब्रिशराव आत्राम यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
२०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून धर्मरावबाबा यांनी विधानसभेत कमबॅक केले. १९९०, १९९९, २००४ अशा तिन्ही वेळच्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी परिवहन, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, खणीकर्म, वनमंत्री म्हणून कारकीर्द गाजवली. दोनवेळा पालकमंत्रिपदही भूषविले. आता आमदारकीच्या चौथ्या टर्मच्या अखेरच्या दिवसांत त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. दरम्यान, १९९१ मध्ये धर्मरावबाबा आत्राम हे नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर होते, यातून त्यांचे अपहरण झाले होते. नक्षल्यांच्या तावडीत सापडलेले धर्मरावबाबा नंतर सुखरूप घरी परतले होते. या अपहरणनाट्याने तेव्हा राज्य हादरून गेले होते.
भाजप नेत्यांपुढे नवा पेच
धर्मरावबाबांना लोकसभा लढवायची आहे. त्यादृष्टीने त्यांनी राजकीय डावपेच आखण्यास सुरुवात केली हाेती. राष्ट्रवादी काँग्रेस अहेरीपुरती मर्यादित आहे, लोकसभेची जागा आघाडीत काँग्रेसकडे आहे, त्यामुळे भाजपसह सर्व पर्याय खुले ठेवल्याची चर्चा असतानाच ते अजित पवारांसोबत सत्तेत गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या आजी- माजी नेत्यांपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. धर्मरावबाबा लोकसभेसाठी कशी खेळी करतात, हे पाहणे मोठे रंजक ठरणार आहे.