संजय तिपाले, गडचिरोली:राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चार दिवसांपूर्वीच पुन्हा समन्स बजावले. सत्तेच्या आडून केंद्र सरकार राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना टार्गेट करत असल्याचा आरोप करत येथे १९ मे रोजी इंदिरा गांधी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकार हमसे डरती है... ईडी को सामने करती है... अशी घोषणाबाजी करुन लक्ष वेधले.
जयंत पाटील यांना ईडीने दुसऱ्यांदा नोटीस बजावली असून २२ मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. जयंत पाटील यांना आलेल्या ईडी नोटीसचे पडसाद १९ मे रोजी शहरात उमटले. शहरातील इंदिरा गांधी चौक येथे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.भाजपकडून ईडीच्या अडून राजकीय हिशेब चुकते करण्याचे काम सुरु असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी केला. मात्र, समाान्यांच्या न्याय- हक्कासाठी दबावाला बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेस लढत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, फहीम काझी, जिल्हा सचिव कपिल बागडे, तालुकाध्यक्ष विवेक बाबनवाडे, संदीप ठाकूर, सेवादलचे अमर खंडारे, विद्यार्थी अध्यक्ष चेतन पेंदाम,सोनाली पुण्यपावार, गुलाम जाफर शेख, तुकाराम पुरणावर, सुनील कातरोजवार, रितीक डोंगरे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.