लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : साहित्याच्या वाचनातून वर्तमान काळातील वेदना व व्याधींचे दर्शन घडते. यातूनच जगात बदल घडवून आणण्याची प्रेरणा समाजात निर्माण होते. वाचन हेच पृथ्वीला तिच्या नाशापासून वाचवू शकते. त्यामुळे समाजात वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यासाठी वाचन केंद्रीत साहित्य संमेलनाची गरज असून असे संमेलन गावोगावी झाले पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यीक व विचारवंत प्रा. वसंत आबाजी डहाके यांनी केले.सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचच्या वतीने चंद्रपूर भूषण माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री स्व. शांताराम पोटदुखे यांच्या स्मृतीस समर्पित दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनाची सुरूवात शनिवारी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या डॉ. जया द्वादशीवार विचारमंचावर झाली. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डहाके उपस्थिताना संबोधित करीत होते. संमेलनाचे उद्घाटन देखण्या सभागृहात मोठ्या थाटात झाले.प्रसिद्ध वात्रटिकाकार, कवी, चित्रपट निर्माता व दिग्दर्शक रामदास फुटाणे यांनी या संमेनाचे उद्घाटन केले. तर मंचावर स्वागताध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, सूर्यांशचे अध्यक्ष इरफान शेख उपस्थित होते. प्रा. डहाके म्हणाले, विचार संवर्धनासाठी भारताची संविधा महत्त्वपूर्ण आहे. मात्र या महान ग्रंथाचे आज वाचन होत नाही. त्यामुळे वर्तमानकाळात नागरिकांकडून मूलभूत कर्तव्य पाळली जात नाही. यातून समाजात गैरकृत्य घडत आहे. त्यामुळे या ग्रंथाबद्दलचा आदर त्याच्या पूजनातून नाही, तर त्याचे वाचन व मनन करून व्यक्त केला पाहिजे. वर्तमान स्थितीत माणसातील व्यक्तीसामर्थ्य हळूहळू नाहिसे होत आहे. माणसाची घूसमट वाढत आहे. अशा परिस्थितीत आपल्या भोवती येणाऱ्या संकटाचा गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे. हा विचार साहित्यातून जन्माला येतो. जेव्हा माणसा-माणसातील प्रेम आटते, तेव्हा लेखक अस्वस्थ होतो आणि यातून निर्माण होणारे साहित्य हे प्रेरणादायी ठरते, असे ते म्हणाले.रामदास फुटाणे म्हणाले, अनुभुती, प्रतिभा व प्रज्ञा एकत्र आल्यास चांगली साहित्यकृती जन्माला येते. निर्णय घेण्याची क्षमता ही फक्त वाचन संस्कृतीत आहे. मात्र आज मोबाईल म्हणजेच वर्तमानपत्र झाले आहे. तरूण पिढी पुस्तकापासून दुरावली आहे. अशा परिस्थितीत त्यांना पुस्तकांपर्यंत आणून वाचन संस्कृती वाढविण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर म्हणाले, साहित्य म्हणजे केवळ भाषेचे व्याकरण व शब्दांचे संग्रह नसून ते मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे. आज अनेक साहित्यिक साहित्याची सेवा करून चंद्रपूरचे नाव उंचीवर नेत आहेत. हा आदिवासीबहुल परिसर असून आदिवासी जनजीवनावरही बरेच साहित्य लिहिल्या जात आहे. हे प्रवाह मराठी साहित्याला समृद्ध करीत आहेत, असेही पाऊणकर म्हणाले.
वाचनकेंद्रित साहित्य संमेलनाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:14 AM
साहित्याच्या वाचनातून वर्तमान काळातील वेदना व व्याधींचे दर्शन घडते. यातूनच जगात बदल घडवून आणण्याची प्रेरणा समाजात निर्माण होते. वाचन हेच पृथ्वीला तिच्या नाशापासून वाचवू शकते.
ठळक मुद्देवसंत डहाके : राज्यस्तरीय साहित्य संमेलनाला प्रारंभ