कुरखेडा : अधिक फायद्याची व कोणत्याही हंगामात पिके घेऊन शेती समृद्ध करायची असेल, तर शेतकऱ्यांनी शेडनेट हाउसमध्ये शेती करण्याची गरज आहे. ही शेती नियंत्रित वातावरणात केली जात असल्याने, काेणत्याही हंगामात पिके घेता येतात. जिल्ह्यात मूलचेरा तालुक्यात प्रथमच शेडनेट हाउस हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. इतरही शेतकऱ्यांनी या शेतीकडे वळण्याची गरज आहे.
कमी उंचीच्या पुलामुळे अडते वाहतूक
चामाेर्शी : तालुक्यातील भेंडाळा परिसरात असलेल्या घारगावजवळील नाल्यावर कमी उंचीचा पूल आहे. हरणघाट, घारगाव, रामाळा, फराडा व मार्कंडादेव या परिसरातील नागरिक या मार्गाने प्रवास करतात. पुलावर संरक्षक भिंत नसल्याने मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहते. अशाही स्थितीत नागरिक या पुलावरून प्रवास करतात. संरक्षक भिंत नसल्याने वाहन सरळ नाल्यात काेसळण्याचा धाेका आहे.
चामोर्शीतील नवीन वस्ती समस्याग्रस्त
चामोर्शी : शहरातील गणेशनगर, हनुमाननगर, आष्टीकडे जाणारा मार्ग वस्ती, ऑफिसर कॉलनी, मूल मार्गाच्या उजव्या बाजूची वस्ती साधूबाबानगर, आदी वस्त्यांमध्ये गेल्या १० वर्षांपासून लोकसंख्या वाढली आहे, परंतु त्या वस्तीत मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या नाहीत. पक्के रस्ते, नाली व पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचा अभाव आहे.
भ्रमणध्वनी सेवा वारंवार विस्कळीत
सिरोंचा : तालुक्यातील आसरअल्ली परिसरात सात ते आठ गावांचा समावेश आहे, परंतु या भागातील बीएसएनएल कव्हरेज व इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. याकडे बीएसएनएलने लक्ष देण्याची गरज आहे.
दुरुस्तीअभावी तलावांची दुरवस्था
चामाेर्शी : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय कमी आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावरच शेती करावी लागत आहे. सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेला मामा तलाव नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तलावांची दुरुस्ती करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे. यासाठी वरिष्ठांनी लक्ष द्यावे.