कोडेकर यांचे प्रतिपादन : जिल्हास्तरीय संवाद कार्यशाळागडचिरोली : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याचा ध्यास शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र प्रत्यक्ष कार्य शिक्षकांना करायचे असून यासाठी शिक्षकांनी नवोपक्रम राबविणे आवश्यक आहे. त्यांना पर्यवेक्षिय यंत्रणेने चांगला प्रतिसाद देणे व योग्य मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन एनसीआरटी पुणेच्या अधिकारी पी. कोडेकर यांनी केले.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत गुरूवारी पर्यवेक्षीय यंत्रणेची जिल्हास्तरीय संवाद कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन कोडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डायटचे प्राचार्य व्ही. जी. चौरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी माणिक साखरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी आर. आर. आत्राम, एनसीआरटी पुणेच्या अधिव्याख्याता नागमोते, उपशिक्षणाधिकारी यू. एन. राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेदरम्यान चामोर्शी तालुक्यातील येनापूर, गडचिरोली तालुक्यातील मुरखळा, आंबेशिवणी, कुरूड, मेंढा हे केंद्र १०० टक्के प्रगत झाले असल्याची घोषणा शिक्षणाधिकाऱ्यांनी केली. गडचिरोली जिल्हा १०० टक्के प्रगत करण्याच्या दृष्टीने विशेष सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर विस्तार अधिकारी मारोती अलोणे, केंद्रप्रमुख गौतम मेश्राम, राजू वडपल्लीवार, प्रकाश दुर्गे, साधन व्यक्ती चांगदेव सोरते, राजू नागरे यांनी चर्चेत सहभाग घेऊन मते मांडली. संचालन अधिव्याख्यात डॉ. नरेश वैद्य तर आभार केंद्रप्रमुख वडपल्लीवार यांनी मानले. मार्च २०१६ पर्यंत गडचिरोली जिल्हा १०० टक्के प्रगत करायचा. तसेच सर्वच शाळांमधून ज्ञानरचनावादाप्रमाणे अध्यापन करण्याचा निर्धार करण्यात आला.
प्रगतीसाठी नवोपक्रमांची गरज
By admin | Published: March 12, 2016 1:43 AM