अहेरी : अहेरी हे राज्यातील सर्वात जुने एसटी आगार आहे. येथून लांब पल्ल्याच्याही अनेक गाड्या जातात. मात्र बहुतांशी गाड्या जुनाट आहे. त्यामुळे वारंवार नादुरुस्त होत आहे. येथून आंतरराज्यीय बससेवाही चालविली जाते. या आगाराला सरकारने नव्या गाड्या द्यावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
शस्त्रक्रियेला प्रतिसाद कमी
गडचिरोली : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजन महिला आघाडीवर आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनजागृतीची गरज आहे.
कारवाई हाेत नसल्याने प्लॅस्टिकचा वापर सुरूच
गडचिरोली : शासनाने प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदीचे आदेश जारी केले आहेत. परंतु ही बंदी केवळ कागदावरच दिसून येत आहे. ५० मायक्रॉन जाडीपेक्षा कमी व ८ ते १२ इंच उंचीपेक्षा लहान आकाराची प्लॅस्टिक पिशवी वापरणे व उत्पादनावर बंदी घालावी, अशी मागणी होत आहे.
निधीअभावी बंधाऱ्यांचे बांधकाम रखडले
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्यावतीने शेकडो बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र या बंधाऱ्यांसाठी निधीच उपलब्ध न झाल्याने बंधाऱ्यांचे बांधकाम रखडले आहे. निधी मिळावा यासाठी पाठपुरावा केला जात आहे.
गडचिरोली शहरात बगीचा तयार करा
गडचिरोली : शहरात सायंकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात नागरिक फिरायला जात असतात. मात्र शहरात कुठेही बसण्यासाठी बगिचा नसल्याने शहरात बगिचा तयार करण्याची मागणी होत आहे. नगरपालिकेमध्ये असलेला शहरातील एकमेव बगिचाही नष्ट झाला आहे.
कढोलीत पक्के रस्ते हवे
वैरागड : कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे सात ते आठ वर्षांपूर्वी अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले. या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात न आल्याने अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्त्यांवर खड्डे की, खड्ड्यात रस्ता, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे पक्क्या रस्त्यांचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.
सिरोंचात डास वाढले
सिरोंचा : शहरातील विविध वॉर्डांत अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजारी लोकांची संख्या वाढत चालली आहे. नगर पंचायतीने शहरात फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.
फलकाचा अभाव
घोट : घोट-रेगडी-विकासपल्ली मार्गाला जोडणाऱ्या निकतवाडा-नवेगाव या मार्गावर गतिरोधक आहे. मात्र गतिरोधक असल्याचा फलक नाही. त्यामुळे सायंकाळी व रात्रीच्या सुमारास अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सातत्याने मागणी करूनही संबंधित विभागाने या ठिकाणी गतिरोधक फलक लावले नाही.
गोकुलनगरात रस्ते खड्डेमय
गडचिरोली : शहरातील गोकुलनगरातील अनेक अंतर्गत रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून लगतच्या नागरिकांनी साहित्य ठेवून अतिक्रमण केले आहे. यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली. न.पं.ने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. काही रस्त्यांची मागील चार वर्षांपासून दुरुस्ती करण्यात आली नाही.
विश्रामगृहाची मागणी
कोरची : कोरची तालुक्याची लोकसंख्या व भौगोलिक विस्तारित क्षेत्राचा विचार करून कोरची येथे शासकीय विश्रामगृह आवश्यक आहे. तशी नागरिकांकडून अनेकदा मागणी करण्यात आली. सदर विश्रामगृहाची मागणी अद्यापही प्रलंबितच आहे. कोरची हे जिल्ह्याचे शेवटचे ठिकाण आहे.
सिरोंचा भागात वृक्षतोड
सिरोंचा : तालुक्यात अनेक ठिकाणी सध्या अवैध वृक्षतोड जोमात सुरू आहे. छत्तीसगड राज्यातील तस्कर नदीमार्ग मोठ्याप्रमाणावर मौल्यवान सागवान घेऊन जात आहेत. वनविभागाने मोहीम तीव्र केली असली तरी तस्करी सुरूच आहे. अनेक जण तेलंगणात सागवानाची तस्करी करतात. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
तलावाभोवती अतिक्रमण
गडचिरोली : गडचिरोली शहराच्या मध्यभागी असलेल्या सिंचन विभागाच्या तलावात अतिक्रमण वाढले आहे. या अतिक्रमणचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. यावर्षी तलावात पाणी कमी असल्याने आणखी जागा हडप करण्याचा प्रयत्न नागरिकांकडून चालविला जात आहे. तलाव साैंदर्यीकरणाचे काम थंडबस्त्यात आहे.
मोकाट जनावरांचा हैदोस
गडचिरोली : दर रविवारी शहरात भरणाऱ्या बाजारात मोकाट गुरांचा हैदोस असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या बाजारात खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. विक्रेत्यांनी ठेवलेल्या भाजीवरही त्यांची नजर चुकवून ताव मारतात. माेकाट जनावरांचा नगर पालिका प्रशासनाने बंदाेबस्त करावा, अशी मागणी आहे.