लोकमत न्यूज नेटवर्क धानोरा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत निर्माण केलेले पाणंद रस्ते अजूनही मजबूत करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सध्या या रस्त्यांवर गुडघाभर पाय फसतात. धानोरा तालुक्यात अजूनपर्यंत अनेक पाणंद रस्ते दुरवस्थेत आहेत. त्यामुळे सदर रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. तालुक्याच्या तुकूम येथे अशाच एका रस्त्याची दुरुस्ती शेतकऱ्यांनी श्रमदानातून केली.
गट ग्रामपंचायत तुकूमअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून तुकूम-गोडेपार या रस्त्यावर माती काम झाले काही ठिकाणी सिमेंट पाईप, तर काही ठिकाणी लहान पुलांची निर्मिती करण्यात आली. मात्र, दरवर्षी पावसात अनेक ठिकाणी खड्डे, तर काही ठिकाणी पाईपजवळील माती पुराने वाहून गेल्याने रस्त्यालगत व रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी अडचण होते. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे अनेकदा या रस्त्याविषयी व संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्रांतर्गत येत असलेल्या पाणंद रस्त्याविषयी ग्रामसभेत सुद्धा दुरुस्ती करून कच्च्या रस्त्याचे रूपांतर पक्क्या रस्त्यात करण्यासाठी मागणी केली. मात्र, ग्रा.पं. ने दुर्लक्ष केले.
पाणंद कच्च्या रस्त्याचे रूपांतर पक्क्या रस्त्यात करणे हे ग्रामपंचायत प्रशासनाचे काम आहे; परंतु याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर गावातील युवांनी श्रमदानातून रस्ता दुरुस्त केला. या कामासाठी योगेंद्र गोटा, अंकुश गोटा, साजू मडावी, अंतराम हलामी, काशीराम वडे, गोपाल करंगामी, रघुनाथ नैताम, ज्योतिराम होळी, यांनी कौतुक केले.
पाठपुराव्याला प्रतिसाद मिळेना
- रोजगार हमी योजनेतून पाणंद रस्त्याचे काम तुकूम येथे करण्यात आले. त्या रस्त्याचे पक्च्या रस्त्यात रूपांतर करणे गरजेचे होते; परंतु याकडे दुर्लक्ष झाले.
- रस्त्याचे मजबुतीकरण करावे, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जि. प. बांधकाम उपविभागीय अधिकारी यांना ग्रामसभेद्वारे पत्र देऊन मागणी करण्यात आली; परंतु याकडे दुर्लक्ष झाले, असा आरोप नागरिकांचा आहे.
- विशेष म्हणजे, पावसाळ्यात चिखल तुडवत शेतकऱ्यांना आपल्या शेतात जावे लागले