गडचिरोली : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या कोरची तालुका मुख्यालयातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील रस्त्यांची दुरूस्ती मागील पाच-सात वर्षांपासून झालेली नाही. त्यामुळे या भागातील रस्ते अतिशय खराब झाले आहेत. वाहतुकीची वर्दळ असणाऱ्या पुलावंरही मोठे खड्डे पडले असून कोचीनारा पुलावरचा खड्डा मोठ्या अपघाताला आमंत्रण देत आहे. अशीच परिस्थिती गडचिरोली तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या मारदा परिसरातील रस्त्याचीही आहे. गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या या भागातील रस्त्याच्या दुरूस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे.कोरची तालुका मुख्यालयापासून कोचीनाराकडे जाणाऱ्या मार्गाची दुरवस्था झाली असून कोचीनारा पुलाजवळ मोठा खड्डा पडला आहे. सदर खड्ड्यामुळे आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत. मात्र सदर खड्डा व मार्ग दुरूस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. कोरची-कोचीनारा हा अत्यंत महत्वाचा व नेहमी वर्दळ राहत असलेला मार्ग आहे. या मार्गावरून बेलगाव, बोटेकसा, बेतकाठी, कोटगुल आदी गावातील नागरिक नेहमीच विविध कामांसाठी कोरची येथे येतात. आपले काम आटोपून सायंकाळी गावाकडे जात असतांना वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वाहनधारकांना खड्डे चुकविणे शक्यच होत नाही. एक खड्डा चुकविताच दुसरा खड्डा पडतो. खड्ड्यांमुळे वाहने भंगार होण्याच्या स्थितीत असून वाहनधारकांनाही पाठ व मनक्याचे त्रास वाढले आहेत. सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. मात्र पावसाळा असल्याने दुरूस्ती शक्य नसल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. मात्र पावसाळा संपूण हिवाळ्याला सुरूवात झाली असली तरी अजूनपर्यंत सदर मार्गाची डागडुजीसुद्धा करण्यात आली नाही. मार्गाची दुर्दशा बघितली तर सदर मार्गाची डागडुजी करण्याऐवजी नवीन बांधकाम करणेच योग्य राहील, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे. कोरची हा नक्षलग्रस्त व जंगलाने व्यापलेला तालुका आहे. त्यामुळे या तालुक्यात वरिष्ठ अधिकारी फारसे लक्ष घालत नाही. स्थानिक अधिकारीसुद्धा कोरची तालुक्यातील समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून देत नाही. परिणामी या समस्यांचा त्रास तालुक्यातील नागरिकांना करावा लागत आहे, असा आरोप भाजपाचे कोरची सचिव मधुकर नकाते यांनी केला आहे.गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मारदा मार्गाची दुरवस्था झाली असून सदर मार्गाच्या दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. पोटेगावपासून दोन किमी अंतरावर असलेले मारदा हे नक्षलप्रभावीत दुर्गम गाव आहे. सदर गाव पोटेगाव ते पावीमुरांडा मार्गावर वसले आहे. मारदा गावाजवळ असलेल्या नाल्यावरील दोन्ही बाजुचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. रस्त्यावरील गिट्टी निघाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या परिसरात शासनाच्यावतीने अनेक विकास कामे सुरू असली तरी या रस्त्याच्या दुरूस्तीकडे मात्र बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. या मार्गाची दुरूस्ती करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने बांधकाम विभागाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. मात्र बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याने मारदावासीयांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर मार्गाची तत्काळ दुरूस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
दुर्गम भागातील रस्ते दुरूस्ती कामांकडे दुर्लक्ष
By admin | Published: November 08, 2014 10:38 PM