लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली आणि देसाईगंज नगर परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक सोमवारी पार पडली. या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी भाजपचे वर्चस्व असल्यामुळे गडचिरोलीतील बांधकाम समितीचा अपवाद वगळता सर्व सभापतींची निवड अविरोध करण्यात आली.गडचिरोलीत बांधकाम सभापतीपद सलग चौथ्यांदा आनंद श्रुंगारपवार यांनी पटकावले. त्यामुळे हा चर्चेचा विषय झाला होता. पाणी पुरवठा सभापती म्हणून वैष्णवी नैताम यांची निवड करण्यात आली. तसेच शिक्षण सभापतीपदी रितू कोलते, वित्त व नियोजन सभापतीपदी निता उंदीरवाडे, महिला व बाल कल्याण सभापतीपदी लता लाटकर, महिला व बाल कल्याण उपसभापतीपदी माधुरी खोब्रागडे यांची वर्णी लागली आहे. नगर परिषदेचे उपाध्यक्ष हे पदसिध्द एका समितीचे सभापती राहतात. त्यामुळे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांच्याकडे पूर्वीचेच आरोग्य खाते कायम ठेवण्यात आले.गडचिरोली नगर परिषदेत नागरिकांमधून निवडून आलेले एकूण २५ नगरसेवक व एक नगराध्यक्ष आहेत. त्यापैकी २३ नगरसेवक व नगराध्यक्ष भाजपचे आहेत. विरोधात केवळ दोन नगरसेवक आहेत. भाजपकडून निवडून आलेल्या सदस्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाला सभापती बनण्याची संधी मिळावी, या उद्देशाने प्रत्येकाला सभापती पद दिले जाईल, असे ठरविण्यात आले होते. तीन वर्ष कोणताही विरोध झाला नाही. मात्र यावर्षी सभापतींची नावे ठरविताना चांगलीच कसरत करावी लागली. मात्र भाजप पक्षश्रेष्ठींकडून जी नावे सुचविले जातील, त्यांनीच सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज भरायचा आहे. अन्य कोणत्याही नगरसेवकाने अर्ज करू नये, अशी स्पष्ट ताकीद नगसेवकांना असल्याने आधीच नावे निश्चित झालेल्या नगरसेवकांनी सभापती पदासाठी अर्ज केले व ते अविरोध निवडून आले.निवडीची औपचारिकता पार पडल्यानंतर नगर परिषदेच्या परिसरात जल्लोष करण्यात आला. यावेळी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्यासह नगरसेवक हजर होते.देसाईगंजातही खांदेपालटदेसाईगंज : देसाईगंज नगर परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक सोमवारी पार पडली. या निवडणुकीत बांधकाम व पाणी पुरवठा वगळता इतर समित्यांचे सभापती बदलले आहेत. नगर परिषद उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा यांच्याकडे सुरूवातीपासूनच बांधकाम खाते आहे. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांच्याकडे पाणी पुरवठा सभापतीपद कायम आहे. आरोग्य, शिक्षण व महिला व बालकल्याण समित्यांचे सभापती बदलले आहेत. आरोग्य सभापती म्हणून सचिन खरकाटे, शिक्षण सभापती म्हणून दीपक झरकर, महिला व बाल कल्याण सभापती म्हणून अश्विनी कांबळे यांची निवड झाली आहे. पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांनी काम पाहिले. निवडीनंतर जल्लोष साजरा करण्यात आला.एससी व एसटीला कनिष्ठ दर्जाची पदेगडचिरोली नगर परिषदेत अनुसूचित जातीचे सहा तर अनुसूचित जमातीचे चार असे एकूण १० नगरसेवक आहेत. हे सर्व नगरसेवक भाजपचे आहेत. मात्र सभापतीपदे देताना अनुसूचित जाती व जमातीच्या नगरसेवकांवर अन्याय केला जात आहे, असा आरोप नगरसेवक तथा माजी सभापती प्रशांत खोब्रागडे यांनी केला.अपवाद वगळता अनुसूचित जाती व जमातीच्या नगरसेवकांच्या माथी वित्त व नियोजन किंवा महिला व बाल कल्याण ही दोनच खाती मारली जात आहेत. गुलाब मडावी, संजय मेश्राम, प्रशांत खोब्रागडे, निता उंदीरवाडे हे आजपर्यंतचे वित्त व नियोजन सभापती आहेत. तर अल्का पोहणकर, रंजना गेडाम, गीता पोटावी, लता लाटकर हे आजपर्यंतचे महिला व बाल कल्याण सभापती आहेत.अनुसूचित जाती व जमातीमध्ये अनेक सुशिक्षीत व हुशार तसेच भाजपसाठी वाहून घेणारे नगरसेवक आहेत. मात्र भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी त्यांना जाणूनबुजून डावलत आहेत. आपण भाजपच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे सादर करणार असल्याचे नगरसेवक प्रशांत खोब्रागडे यांनी सांगितले.
सभापतिपदासाठी नवीन चेहऱ्यांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 5:00 AM
गडचिरोलीत बांधकाम सभापतीपद सलग चौथ्यांदा आनंद श्रुंगारपवार यांनी पटकावले. त्यामुळे हा चर्चेचा विषय झाला होता. पाणी पुरवठा सभापती म्हणून वैष्णवी नैताम यांची निवड करण्यात आली. तसेच शिक्षण सभापतीपदी रितू कोलते, वित्त व नियोजन सभापतीपदी निता उंदीरवाडे, महिला व बाल कल्याण सभापतीपदी लता लाटकर, महिला व बाल कल्याण उपसभापतीपदी माधुरी खोब्रागडे यांची वर्णी लागली आहे.
ठळक मुद्देनगर परिषद विषय समित्या : गडचिरोली व देसाईगंजमध्ये झाली अविरोध खांदेपालट