इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शन : विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीने कमी खर्चात बनविले यंत्र; उपस्थितांचे लक्ष घेतले वेधूनगडचिरोली : स्थानिक शिवाजी कला महाविद्यालयात शनिवारपासून इन्स्पायर अवॉर्ड अंतर्गत विज्ञान प्रदर्शनाची आयोजन करण्यात आले आहे. या विज्ञान प्रदर्शनात जिल्हाभरातील २६८ विद्यार्थ्यांनी आपले मॉडेल ठेवले आहेत. यातील काही मॉडेल जुनीच री ओढणारे आहेत. शिक्षण विभागाने सक्तीचे केले. त्याचबरोबर मॉडेल बनविण्यासाठी पाच हजार रूपयांची रक्कम मिळाली. त्यामुळे काहीतरी मॉडेल सादर करणे एवढाच उद्देश असल्यााचे काही मॉडेलकडे बघितल्यानंतर दिसून येते. मात्र काही विद्यार्थ्यांनी तयार केलेले मॉडेल मात्र समाजिक उपयोगाचे असून त्यांच्यामध्ये नाविण्यता दिसून येते. काही मॉडेलचा खर्च तर पाच हजार रूपयांपेक्षाही जास्त झाला असावा. संबंधित शिक्षक व विद्यार्थ्याने पैशाचा विचार न करता एक नवीन तंत्रज्ञान निर्माण केल्याचे यामधून दिसून येते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजावा. त्यांच्यामध्ये असलेल्या विज्ञानाच्या नवीन कल्पनांना मूर्त स्वरूप प्राप्त व्हावे, हा उद्देश ठेवून इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात आणलेल्या काही विद्यार्थ्यांच्या मॉडेलने ही अपेक्षा निश्चितच पूर्ण केली असल्याचे दिसून येते. या बालवैज्ञानिकांना योग्य मार्गदर्शन व शिक्षण मिळाल्यास त्यांच्यापैकी एखादा तरी भविष्यात निश्चितच डॉ. एपीजे अब्दुल कलाम बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. मॉडेलमधील नावीन्यता बघून प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले होते. (नगर प्रतिनिधी)
बालवैज्ञानिकांनी शोधले नवीन तंत्रज्ञान
By admin | Published: August 10, 2015 1:00 AM