गडचिरोली : लाेकशाहीच्या उत्सवात सहभाग घेऊन मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी शुक्रवारी गडचिराेली शहरात नव मतदार, दिव्यांग, वृध्दांची मतदार रथामध्ये बसवून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक मतदान केंद्रापर्यंत पाेहाेचल्यानंतर मतदारांनी हक्क बजावला.
नवमतदारांना मतदानासाठी प्राेत्साहन मिळावे, दिव्यांग व वृद्ध व्यक्तींना मतदानाचा हक्क बजावताना अडचणी येऊ नयेत यासाठी निवडणूक विभागाने मतदार रथाची साेय केली हाेती. त्यानुसार गडचिराेली शहरातील नवमतदार, दिव्यांग, वृद्ध व्यक्तींना मतदार रथामध्ये बसवून बुथपर्यंत ही मिरवणूक नेण्यात आली. ही मिरवणूक पारंपरिक वाद्याच्या गजरात इंदिरा गांधी चाैकातून मतदान केंद्रापर्यंत नेण्यात आली. यामुळे नवमतदारांमध्ये उत्साह निर्माण झाला. या मिरवणुकीत निवडणूक विभागाचे अधिकारी व कर्मचारीसुद्धा सहभागी झाले हाेते.
पुष्पगुच्छ व हाराने स्वागत
मिरवणुकीदरम्यान पुष्पहार व गुच्छाने दिव्यांग मतदारांचे स्वागत निवडणूक विभागातर्फे स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले. स्वागत पाहून नवमतदार, दिव्यांग व वृद्ध मतदार भारावले.