गडचिराेली : गेल्या पंधरवड्यापासून राज्यातील वेगवेगळ्या भागांत अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे गहू, तेलवर्गीय पिके; तसेच कडधान्य पिकांचे नुकसान झाले. याचा परिणाम उत्पादनावर हाेण्याची शक्यता आहे. आतापासूनच गहू व ज्वारीचे पीक क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी महाग झाल्याने वर्षभरात या किमती आणखी वधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्षभराचा साठा आताच खरेदी करून ठेवणे फायदेशीर ठरेल.
गडचिराेली जिल्ह्यात कडधान्य पिकांचे उत्पादन फेब्रुवारी ते मार्च महिन्यांत घेतले जाते. सदर पीक ऑक्टाेबर ते नाेव्हेंबर याच कालावधीत लागवड केले जाते. अवघ्या तीन ते चार महिन्यांत पीक निघत असून पीक निघाल्यानंतर शेतकरी याची विक्री खुल्या बाजारात करतात. यात शेतकऱ्यांची माेठ्या प्रमाणात आर्थिक लूट हाेते. अशी स्थिती दरवर्षीच जिल्ह्यात निर्माण हाेते. यावर्षी पुन्हा अवकाळीचा फटका बसल्याने गहू व ज्वारीचे भाव वधारतील; पण त्याचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक हाेईल.
अवकाळी पावसाचा फटका
गडचिराेली जिल्ह्यात मागील आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे उडीद, मूग, हरभरा, जवस, तूर पीक, मसूर यासह विविध प्रकारच्या रब्बी पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून येते.
गहू २०० रुपयांनी महाग
खुल्या बाजारपेठेत गव्हाचे दर दाेन हजार ते तीन हजार रुपये प्रतिक्विंंटलप्रमाणे आहेत. यात आता दीडशे ते दाेनशे रुपयांची भर पडली आहे. त्यामुळे खरेदी करून उपजीविका करणाऱ्या ग्राहकांवर आर्थिक भार पडला आहे.
ज्वारी ३०० रुपयांनी महाग
ज्वारीचे दर खुल्या बाजारात ३५ ते ४० रुपये प्रतिकिलाे आहेत. म्हणजे, चार हजार रुपयांच्या आसपास प्रतिक्विंटल दर आहे. आता यातसुद्धा भर पडली असून ४ हजार ३०० रुपयांच्या वर दर पाेहाेचले आहेत.
‘कृउबास’मध्ये आवकच नाही
गडचिराेली जिल्ह्यात पाच कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत; परंतु येथे आवक हाेत नसल्याने हमीभावात खरेदी केली जात नाही. परिणामी ‘कृउबास’मार्फत कडधान्य पिकांची खरेदी हाेत नाही.
अवकाळी पावसामुळे खुल्या बाजारातही कडधान्य पिकांची आवक कमी आहे. जिल्ह्यात गव्हाची विक्री फार कमी शेतकरी करतात. ज्वारी तर विक्री करण्यास पाहत नाही. आम्हाला बाहेरूनच बाेलावून अन्य व्यावसायिकांना ज्वारीचा पुरवठा करावा लागताे.
- सदानंद बारसागडे, व्यापारी