आलापल्ली : येथील नवनियुक्त सरपंच शंकर मेश्राम यांनी पदभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी आलापल्ली येथील कचरा नेणारा ट्रॅक्टर चालवून ग्रामवासीयांचे लक्ष वेधले आणि लगेच दुसऱ्याच दिवशी उपसरपंच विनोद अकनपल्लीवार आणि नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्य यांना सोबत घेऊन गावातील बंद असलेल्या सहा हातपंपांची तातडीने दुरुस्ती करून घेतली.
येत्या दाेन दिवसांत उर्वरित १५ नादुरुस्त हातपंप दुरुस्त करण्याचा मानस त्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला. उन्हाळ्यात गावकऱ्यांना पाण्याची टंचाई भासू नये, लोकांची पाण्यासाठी गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेत विकासकामाला पहिल्या दिवसापासूनच सुरुवात केली, असे शंकर मेश्राम यांनी सांगितले. सरपंच शंकर मेश्राम यांनी कोरोनाच्या काळात अनेकदा लोकांची मदत केली असून, ते ‘सामाजिक कार्यकर्ते’ म्हणून प्रसिद्ध असल्याने ग्रामवासीयांना अनेक विकासकामाची त्यांच्याकडून अपेक्षा आहे.