तहसीलदारांची कारवाई : कठाणी नदी पात्रातून होत होती अवैध वाहतूक गडचिरोली : नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे उपविभागीय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार संतोष खांडरे यांनी आपल्या सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसह येथून जवळच असलेल्या कठाणी नदी पात्रात धाड टाकून रेतीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या नऊ बैलबंड्या मंगळवारी सकाळी ५ वाजताच्या सुमारास पकडल्या. गडचिरोलीच्या फुले वार्डातील काही नागरिकांनी कठाणी नदी पात्रातून बैलबंडीद्वारे अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असल्याची तक्रार तहसीलदार खांडरे यांच्याकडे केली होती. सदर बैलबंड्याच्या रेती वाहतुकीमुळे त्रास होत असल्याचे तक्रारीत नमूद केले होते. या तक्रारीची दखल घेऊन तहसील कार्यालयाच्या पथकाने रेती तस्करांवर कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या बैलबंड्यामध्ये विलास महादेव भांडेकर, उमेश मधुकर वाणी, रमेश दारसू उसेंडी, रवी तुळशीराम कोटांगले, हितेश गंगाधर टिंगुसले, विलास मुकाजी भोयर, गुरूदेव गणपत काटवे, राजू मुकरू लटारे व मोनाजी फकीरा गेडाम सर्व रा. गडचिरोली यांच्या मालकीच्या आहेत. या नऊ बैलबंडीधारकांवर गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई तहसीलदार संतोष खांडरे, नायब तहसीलदार एन. जी. खारकर, मंडल अधिकारी एस. एस. बारसागडे, पी. ए. डांगे, तलाठी बी. ए. बांबोळे, बी. आर. जवंजाळकर, जी. जी. खांडरे, ए. एम. गेडाम, एन. ए. भानारकर तसेच वाकडीचे तलाठी एस. एस. लाडवे यांच्या पथकाने केली. (स्थानिक प्रतिनिधी)
रेतीची तस्करी करणाऱ्या नऊ बैलबंड्या पकडल्या
By admin | Published: April 20, 2017 2:01 AM