पत्रपरिषद : पोरेड्डीवार इंजिनिअरिंग कॉलेजमधील प्रकारगडचिरोली : बोदली येथील नामदेवराव पोरेड्डीवार अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे येथील १६ प्राध्यापकांचे जानेवारी ते सप्टेंबर २०१६ या कालावधीतील नऊ महिन्यांचे वेतन प्रलंबित आहे. त्यामुळे आम्हा प्राध्यापकांवर आर्थिक संकट ओढवले आहे, अशी माहिती पोरेड्डीवार अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक गोविंद सरकार, संतोष हेडाऊ, रजत वंजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.यंदाच्या शैक्षणिक सत्रापूर्वी प्राचार्यांनी आमच्याकडून प्रवेश प्रक्रियेची कामे करवून घेतली. सदर प्रवेश प्रक्रिया मे, जून २०१६ या कालावधीत पार पडली. याशिवाय प्रात्यक्षिक व इतर कामात गुंतविण्यात आले. जून २०१६ रोजी महाविद्यालय प्रशासनाने प्राध्यापक पदासाठी नवी मुलाखत प्रक्रिया घेतली. सदर प्रक्रिया केवळ दाखविण्यापूर्ती असून तुम्ही आपली सेवा नियमित सुरू ठेवा, असे प्राचार्यांनी सांगितले. त्यानंतर प्राचार्यांनी २९ जुलै रोजी आम्हाला बोलावून बैठक घेतली. पुढील आदेश मिळेपर्यंत तुम्ही महाविद्यालयात येऊ नका, असे सांगितले. मात्र महाविद्यालय प्रशासनाने आमचे वेतन अडवून व आम्हाला अंधारात ठेवून नव्या प्राध्यापकांची नियुक्ती केली. महाविद्यालयातर्फे आमचे सेवापुस्तिका तयार करण्यात आले नसून आम्हाला आमचे कागदपत्र व अनुभव प्रमाणपत्रही देण्यात आले नाही. त्यामुळे दुसऱ्या महाविद्यालयात नोकरी मिळणे कठीण झाले आहे. प्रशासन व संस्थेने आमच्यावर अन्याय केला आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रा. राजेंद्र पेंदाम, प्रा. मो. अक्रम सय्यद, प्रा. पवन शातलवार, प्रा. जयवंत देवतळे, प्रा. असद शेख उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
१६ प्राध्यापकांचे नऊ महिन्यांचे वेतन प्रलंबित
By admin | Published: September 15, 2016 1:55 AM