गडचिराेली : संपूर्ण जगाला जेरीस आणणाऱ्या कोरोनासारख्या महामारीला गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात नियंत्रणात ठेवणे मोठे आव्हान होते. पण हे आव्हान लिलया पेलत आरोग्य विभागाने वर्षअखेर कोरोनावर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवले. गेल्या ९ महिन्यात झालेली आरोग्य विभागाची दमछाक अजून थांबलेली नसली तरी नवीन वर्षात ती पूर्णपणे थांबेल अशी आशा सर्वांना आहे.
२०२० हे वर्ष नागरिकांसाेबतच आराेग्य कर्मचाऱ्यांनाही स्मरणात राहणारे ठरले. गडचिराेली जिल्ह्यात १८ मे राेजी काेराेनाचा पहिला रूग्ण आढळून आला. त्यापूर्वीही आराेग्य यंत्रणा काेराेनाची साथ पसरणार नाही, यासाठी जिल्हाभरात प्रयत्न करत हाेती. गडचिराेली जिल्ह्यात कुपाेषण, रक्ताक्षय, मलेरिया रूग्णांची संख्या अधिक आहे. त्यातच आराेग्य यंत्रणेतील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यमान आराेग्य यंत्रणेवर कामाचा लाेड अधिक आहे. अशातच काेराेनाच्या साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आराेग्य यंत्रणेला प्रयत्न करावे लागले. काेराेना रूग्णापासून सख्खे नातेवाईक अंतर ठेवून राहत हाेते. शासनाने लाॅकडाऊन जाहीर केले. अशाही स्थितीत आराेग्य यंत्रणा मात्र प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करीत हाेते. यातील अनेक आराेग्य कर्मचाऱ्यांना काेराेनाची लागण झाली. मात्र न डगमगता या यंत्रणेने जिल्ह्यात काम केले. जिल्ह्यात दिवाळीच्या आधी क्रियाशिल रुग्णांची संख्या १ हजाराच्या घरात होती. ती आता २०० पेक्षा कमी झाली आहे. येत्या काही दिवसात ती शून्य झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.
काेराेनाच्या साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा रूग्णालयाला अनेक नवीन मशीन उपलब्ध झाल्या आहेत. आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा मिळाल्यामुळे चाचणीचा अहवाल येण्यासाठी ३ ते ४ दिवसांची प्रतीक्षा करणे थांबले. काेराेनाची साथ संपेल तरीही या मशीन जिल्हा रूग्णालयातच राहणार असल्याने भविष्यात त्यांचा वापर इतर रूग्णांसाठी हाेऊ शकणार आहे.
बाॅक्स
काेराेनामुळे आली आराेग्यविषयक जागृती
काेराेनाच्या साथीमुळे माेठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. हे जरी मान्य केले तरी काेराेनाने काही सकारात्मक बाबी शिकविल्या आहेत. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे नागरिकांमध्ये आराेग्यविषयक जागृती निर्माण झाली. अनेकांनी मास्कचा वापर सुरू केल्याने धुळीपासून हाेणारा त्रास वाचला. तसेच काेराेनासाेबत इतर संसर्गजन्य आजारांपासून त्यांचा बचाव झाला. अनेकांना आता मास्क घालण्याची सवय झाली आहे. राेग प्रतिकारकक्षमता वाढविण्यासाठी संतुलीत आहार, व्यायाम या बाबींची नागरिकांमध्ये जागृती झाली. तसेच आयुर्वेदाने सांगितलेल्या काढ्याचा वापर पुन्हा सुरू झाला.