गडचिराेली : पंक्चर दुरूस्त करण्यासाठी रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या स्कूल बसला ट्रकने धडक दिल्याने बस उलटून नऊ विद्यार्थी जखमी झाले. हा अपघात गडचिराेलीजवळ चंद्रपूर मार्गावरील नवेगाव येथे गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास घडला.
माहितीनुसार, डाेंगरगाव येथील सेंट जाेसेफ नॅशनल स्कूलची बस विद्यार्थ्यांना घेऊन नवेगावकडे जात हाेती. दरम्यान टायर पंक्चर झाल्याने नवेगावजवळ बस उभी करून पंक्चर दुरूस्त केला जात हाेता. यावेळी विद्यार्थी स्कूल बसमध्येच बसले हाेते. दरम्यान छत्तीसगडवरून मूलकडे जात असलेल्या ट्रकने स्कूल बसला मागून धडक दिली.
ही धडक जाेरात बसल्याने स्कूल बस रस्त्याच्या मधाेमध असलेल्या दुभाजकावर जावून उलटली. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या सायकलस्वारालाही बसने धडक दिल्याने तो ही जखमी झाला. तसेच बसमधील नऊ विद्यार्थी जखमी झाले. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. धडक देणारा ट्रक रस्त्यालगत असलेल्या दुकानाच्या दिशेने गेला. पण तिथे असलेल्या विद्युत खांबामुळे ताे अडला.
जखमी विद्यार्थ्यांमध्ये शाैर्य खाेब्रागडे (१२), स्पंदन काेंडावार (१२), प्रतिक समजदार (१५), सुनील भांडेकर (१२), श्रेयस काेंडावार (८), अनुष्का शर्मा (१२), आदिती शर्मा (१३), श्रेया रायपुरे (१३), अव्हिरा कांबळे (४) आदींचा समावेश आहे. गडचिराेली पाेलिसांनी ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून स्कूल बसही जप्त केली आहे.