गाेपाल लाजुरकर
गडचिराेली : राज्यात सर्वाधिक जंगल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात ९० च्या दशकानंतर २०१७-१८ मध्ये पुन्हा वाघांचा संचार वाढला. त्यापाठोपाठ मानव-वन्यजीव संघर्षही वाढण्यास सुरुवात झाली. अशातच पुन्हा वाघ व बिबट्यांच्या शिकारीही वाढल्या. २०१९ ते फेब्रुवारी २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण नऊ वाघ व बिबट्यांचामृत्यू झाला. मात्र, यात शिकारीपेक्षा वाघ व बिबट्यांच्या मृत्यूस नैसर्गिक कारणच जबाबदार असल्याचे वनविभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
या जिल्ह्यात ९० च्या दशकानंतर पहिल्यांदाच ६ जून २०१९ राेजी वडसा वनविभागातील काेंढाळा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचे नर पिलू ठार झाले. त्यानंतर २९ जुलैला एकलपूर शेतशिवारात नर बिबट्याचा करंट लागून मृत्यू झाला. त्यापाठोपाठ पाेर्ला वनक्षेत्रातील चुरचुरा येथे नर बिबट्या मृतावस्थेत आढळला. गडचिराेली वन विभागातील अमिर्झा येथे १८ जानेवारी २०२० रोजी, तर खुर्सा जंगलात २३ जून २०२० राेजी वाघ मृतावस्थेत आढळले. याशिवाय वडसा वनविभागातील चाेप येथे नर बिबट, आलापल्ली वन विभागातील माेसम येथे मादी वाघ, नेंडेर येथे नर वाघ, वडसा वन विभागातील पाेर्ला येथे नर वाघ मृतावस्थेत आढळला. आतापर्यंत पाच वाघ आणि चार बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पाच प्राण्यांचा मृत्यू नैसर्गिक, दाेन बिबट्यांचा अपघाती, तर एका बिबट्याचा विद्युत करंटने मृत्यू झाला. एका वाघाची शिकार विद्युत प्रवाह साेडून करण्यात आली.
झुंजीमुळे दाेघांचा बळी
गडचिराेली जिल्ह्यात वाघांची संख्या गेल्या तीन वर्षांत झपाट्याने वाढली. ती नेमकी किती हा आकडा वन विभागाकडे उपलब्ध नाही; परंतु वाढलेल्या संख्येमुळे दाेन नर वाघांमध्ये आपल्या हद्दीवरून झुंजी झाल्या आहेत. यामध्ये चातगाव वनपरिक्षेत्रातील खुर्सा येथे एका वाघाचा बळी, तर पाेर्ला वनक्षेत्रातील साखरा जंगल परिसरात दुसऱ्या एका वाघाचा मृत्यू झाला हाेता. अमिर्झा नजीकच्या माैशीचक येथे एका वाघाचा भूकबळी गेला आहे.