तहसीलदारांना निवेदन : निकाली काढण्याची काँग्रेसची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : श्रावणबाळ निराधार योजना व वृद्ध कलावंतांचे मागील तीन महिन्यापासूनचे मानधन रखडलेले आहे. सदर मानधन वितरित न झाल्याने निराधार व वृद्ध कलावंतांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदर मानधन तत्काळ अदा करावे, अशी मागणी आरमोरी विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे तहसीलदारांमार्फत पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. श्रावण बाळ निराधार योजनेचे लाभार्थी व वृद्ध कलावंतांना दरमहा मिळणाऱ्या मानधनावर अवलंबून राहावे लागते. या मानधनावरच ते आपली उपजिविका करीत असतात. परंतु मागील तीन महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. मानधन मिळाले की, नाही याची खात्री करण्याकरिता वृद्ध नेहमी बँकेच्या हेलपाटा मारत आहेत. त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. निराधार व वृद्ध कलावंतांचे मानधन त्यांच्या खात्यात तत्काळ जमा करावे, अशी मागणी आरमोरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिलींद खोब्रागडे, साहिल कोवे, मयुर चौधरी, रूपेश फुलबांधे, राकेश खेडकर, राहूल हनवते, आकाश कांबळे, साबीर शेख, पंकज मोगरकार, योगेश दुमाने, कुंदन कुमरे, हितेश लाडे, नवनाथ भोयर, आकाश सेलोकर यांनी केली आहे. आॅफलाईन केंद्र सुरू करा आॅनलाईन सुविधा केंद्र बंद करून आॅनलाईन सेतू सुविधा केंद्र सुरू करावे, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. आॅनलाईन सुविधा केंद्रामुळे लाभार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेता त्यांच्या सोयीसुविधेसाठी आॅफलाईन सेतू केंद्र सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली.
निराधारांचे मानधन रखडले
By admin | Published: June 15, 2017 1:35 AM