संजय तिपाले, गडचिरोली: माओवाद्यांच्या हिंसेविरुध्द बालेकिल्ल्यातच उठाव सुरु झाला आहे. २४ जूनला भामरागड तालुक्यातील आणखी ५ गावच्या रहिवाशांनी नक्षल्यांना गावात 'नो एंट्री'चा निर्धार केला आहे. एवढेच नाही तर २०० भरमार बंदुका व ४५० सळाया पोलिसांकडे सुपूर्द केल्या आहेत.माओवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. २००३ पासून नक्षल गावबंदी योजना सुरु आहे. या योजनेच्या अनुषंगाने पोलिस दलामार्फत जनजागृती सुरु आहे.
विविध शासकीय योजनांचा लाभ देऊन हिंसक चळवळीकडे भरकटलेल्यांना पुन्हा विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आत्मसमर्पण योजनाही आहे. दरम्यान २४ जून रोजी भामरागड तालुक्यातील लाहेरी उप पोलिस ठाणे हद्दीतील मोरडपार, आलदंडी, कोयर, गोपणार व मुरुंगल या पाच गावांतील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन नक्षल्यांना गावबंदी करुन त्याबाबतचा ठराव पोलिसांना सादर केला. पाचही गावे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असून माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाया अबुझमाड परिसराच्या अगदी जवळ असल्याने या गावांमध्ये माओवाद्यांचे वर्चस्व होते. तसेच गावातील काही सदस्यांचा माओवाद्यांना पाठिंबा होता. मात्र, आता लोकांमध्ये परिवर्तन होत असून हिंसक चळवळीला नकार देण्याची हिंमत दाखविली जात आहे. दरम्यान, गावकऱ्यांनी भरमार बंदुका व सळाया व स्फोटक वस्तूही पोलिसांकडे सोपविल्या आहेत.उपअधीक्षक अमर मोहिते, लाहेरी येथील प्रभारी अधिकारी संतोष काजळे, उपनिरीक्षक प्रशांत डगवार, सचिन सरकटे, आकाश पुयड व धोडराज येथील प्रभारी अधिकारी शरद काकळीज, उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी यांनी यासाठी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.१० दिवसांत १३ गावांनी केली नक्षलबंदी
१४ जूनला भामरागड उपविभागांअंतर्गत धोडराज पोलिस ठाण्यात घेण्यात आलेल्या कृषी मेळाव्यामध्ये परायणार, नेलगुंडा, कुचेर, कवंडे, गोंगवाडा, मिळदापल्ली व महाकापाडी या सात गावांतील नागरिकांनी नक्षल्यांना गावबंदीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भटपार गावकऱ्यांनीही नक्षल्यांविरुध्द उठाव केला. आता आणखी पाच गावांनी निर्धार केल्याने दहा दिवसांत १३ गावांनी नक्षल्यांना नो एंट्रीचा इशारा दिला आहे.नक्षल्यांची दुहेरी कोंडी
दरम्यान २२ जूनला जहाल नक्षल नेता गिरीधर तुमरेटी उर्फ गिरीधर व त्याची पत्नी संगीता या दाम्पत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. त्यानंतर दुसरीकडे बालेकिल्ल्यातच माओवाद्यांविरुध्द उठाव सुरु केला आहे. त्यामुळे माओवाद्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुहेरी कोंडीमुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.