येथील उपविभागीय कार्यालयात रविवारी ५ सप्टेंबरला अनुसूचित जमातीच्या नागरिकांना जातीचे प्रमाणपत्रे व सामूहिक वनहक्क पट्टे वितरणाच्या कार्यक्रमात उद्घाटनीय स्थानावरून ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता, नायब तहसीलदार जनक काळबाजीवार आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीच्या दाखल्यांची गरज असते, जातीचा दाखला मिळविण्यासाठी गोरगरीब नागरिकांची मोठी दमछाक होते. त्यामुळे पैशांची बचत व्हावी आणि ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना अधिक घट्टपणे रूजविण्यासाठी सदर उपक्रम राबविण्यात येत आहे. अलीकडे एटापल्ली तालुक्यात जवळपास १३ हजारांवर जातीचे दाखले तयार करण्यात आले असून नागरिकांना ते सुरक्षितरित्या पोहोचविण्याचे कार्य महसूल विभाग करत आहे, त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार आत्राम यांच्या हस्ते ५० जातीचे दाखले, सहा सामूहिक वनहक्क पट्टे व वैयक्तिक एक वनहक्क पट्टा लाभार्थ्यांना देऊन जातीचे प्रमाणपत्रे व अन्य दाखले वाटपाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. याचवेळी आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून माला शंकर आत्राम व रत्नमाला विलास मोहुर्ले यांना प्रत्येकी वीस हजार रुपयांचा धनादेश देण्यात आले. उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता यांनी, शासनाचे कल्याणकारी व लोकाभिमुख योजनेचा लाभ प्रत्येक नागरिकांना मिळण्यासाठी खासकरून भामरागड व एटापल्ली तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे या मुख्य उद्देशाने जातीचे प्रमाणपत्रे व अन्य दाखले मोठ्या प्रमाणात व तत्काळ बनवून देण्यात येत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन तलाठी गोकुळ वनकर यांनी केले. यावेळी रा.काँ.चे तालुकाध्यक्ष दौलत दहागावकर, सांबा हिचामी, जि. प. सदस्य ग्यानकुमारी कौशिक, महिला तालुकाध्यक्ष ललिता मडावी, पौर्णिमा श्रीरामवार, बेबी लेकामी, विनोद पत्तीवार तसेच महसूल विभागाचे कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.
बॉक्स
अनेकांनी कडेवर (कुशीत) प्राप्त केले प्रमाणपत्र
जातीचा दाखला प्राप्त करून घेण्यासाठी अनेक बालक आपल्या आईच्या कडेवर आले होते. नावाची घोषणा होताच आईच्या कडेवर (कुशीत) बालकांनी जातीचे प्रमाणपत्रे प्राप्त करून घेतले. यावेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनीसुद्धा चिमुकल्यांना जातीचा दाखला देऊन कौतुक केले. चिमुकल्या बालकांना प्रमाणपत्र देण्याचा हा कार्यक्रम कुतुहलाचा विषय ठरला.