बँकांअभावी अडचण
धानोरा : ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा नाहीत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक व्यवहार करताना अडचण निर्माण होत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना ग्रामीण भागात शाखा स्थापन करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी होत आहे.
कृषिपंप अजूनही विजेच्या प्रतीक्षेत
कोरची : शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटरपंप देण्यात आले. शेतकऱ्यांनी वीजजोडणीसाठी डिमांडची रक्कम भरली. मात्र, दोन वर्षांचा कालावधी उलटूनही जोडणी मिळाली नाही.
कुरखेडा तालुक्यातील गावांना लाइनमनच नाही
कुरखेडा : तालुक्यातील अनेक गावांत राइस मिल, आटा चक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपांना विद्युतपुरवठा करावा लागतो, परंतु अनेक गावांत लाइनमन नसल्याने विद्युतपुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते.
विकासासाठी निधी द्या
आष्टी : ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून पंचायत समितीकडे बघितले जाते. मात्र मागील काही दिवसांपासून पं. स. निधीच उपलब्ध करून दिला जात नसल्याने महत्त्व कमी झाले आहे. पंचायत समितीच्या गण स्तरावर निधी उपलब्ध करून दिल्यास गणांचा विकास होण्यास मदत होईल.
भाकरोंडीत रस्ते खड्डेमय
आरमोरी : भाकरोंडी परिसरातील अनेक गावांतील रस्त्यांचे २० वर्षांपूर्वी बांधकाम करून डांबरीकरण करण्यात आले, परंतु सदर मार्गाची अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आता डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे.
औद्योगिकीकरण नाममात्र
धानोरा : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या धानोरा तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे व्यावसायिकांना उद्योग टाकण्यास अडचणी येत आहेत. जागा उपलब्ध असूनही वापर नाही.
कव्हरेजचा अभाव
अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली येथील नागरिकांशी संपर्क होत नाही. अतिदुर्गम भागात कव्हरेजच्या नावाने बाेंब हाेत आहे.
सातबारा मिळेना
वैरागड : वनहक्क कायद्यांतर्गत शेतकऱ्यांना अतिक्रमित जागेच्या मालकी हक्काचे पट्टे देण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरू आहे. मात्र, हे पट्टे मिळालेले शेकडो शेतकरी सातबारापासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास अडचणी येत आहे. सातबारा नसल्याने कृषी याेजनांचा लाभ मिळत नाही.
मालेवाडा भागात समस्या
कुरखेडा : कोरची व धानोरा या दुर्गम भागांना जोडणारा मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किमीच्या परिसरात केवळ एकाच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भरवशावर आरोग्य सेवा आहे. आरोग्यसेवा सुधारण्याची मागणी होत आहे, परंतु याकडे दुर्लक्ष हाेत आहे.