भामरागड (गडचिरोली) : जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील कुमनार (कोयरटोला) येथील गरोदर मातेला प्रसूतीसाठी रुग्णालयात भरती करायचे होते. मात्र रस्ता नसल्याने रुग्णवाहिका गावापर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबातील व गावकऱ्यांनी तिला खाटेवर आणून लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले. सुदैवाने तिची सुखरुप प्रसूती झाली असून बाळ व मातेची प्रकृती उत्तम आहे.
कुमनार येथील कुंडरी कमलेश पुंगाटी या २५ वर्षीय गरोदर मातेच्या बाळंतपणासाठी या गावात रस्ते नसल्याने तिला खाटेवर झुला बनवून तब्बल १८ किलोमीटर अंतर पायपीट करुन लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणावे लागले. कुंडरी कमलेश पुंगाटी हिला ९ मार्च राेजी बुधवारी पहाटेपासुन प्रसव वेदना सुरु झाल्या. मात्र गावापर्यंत रस्ता नाही. बैलबंडीने देखील जात येत नाही. डोंगराच्या पलीकडे गाव आहे. नाल्यातुन वाट काढत गावकऱ्यांच्या मदतीने खाटेवर टाकून पायी चालत आणून रुग्णालयात भरती केले. प्राथमिक आरोग्य केंद्राची स्टाॅप नर्स ए.ए.शेख यांनी गराेदर मातेची लगेच प्रसूती केल्याने तिचे प्राण वाचले.
७५ वर्षांपासून संघर्ष कायम
जिल्ह्यातील सीमेवरती गावात मूलभूत सुविधा पोहचल्याच नाही. ७५ वर्षे उलटले तरी आदिवासींचा संघर्ष कायमच आहे. रस्त्याअभावी रुग्ण रुग्णालयात वेळेवर पोहचू शकत नाही. परिणामी अनेकांचा जीव गेला. घटनेचे वृत्त प्रकाशित होते तेंव्हा सर्वत्र दु:ख व्यक्त केले जाते. शासन प्रशासन दोन दिवस हलचल करते. त्यानंतर परिस्थिती जैसे-थे हाेते.