चामाेर्शी तालुक्यातील फराडा येथील नुकसान झालेल्या पिकाचे २०१९ मध्ये सर्वेक्षण करून पंचनामा करण्यात आला. त्याची यादी तयार करण्यात आली, परंतु ती यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही. अनेकदा तलाठ्यांना याबाबत विचारणा केली. तेव्हा तलाठ्यांनी यादी तहसील कार्यालयात सादर झाली. ती यादी आपल्याकडे नाही व ती आपण दाखवू शकत नाही. यादी पाहायची असल्यास तहसील कार्यालयात जावे, असे सांगितले हाेते. प्रत्येक शेतकरी तहसील कार्यालयात जाणे शक्य नव्हते. त्यामुळे शेतकरी मदतीची प्रतीक्षा करीत हाेते. मागील खरीप हंगामात ऑगस्ट, २०२० मध्ये पुन्हा अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. त्याचे सर्वेक्षण व पंचनामे झाले व यादी ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांना दाखविण्यात आली. काही चुका झाल्यानंतर त्यात सुधारणाही झाली. २०१९ व २०२० मध्ये झालेल्या पीक नुकसानीची भरपाई काही शेतकऱ्यांना मिळाली, परंतु बरेच शेतकरी यापासून वंचित राहिले. याबाबत शेतकऱ्यांनी तलाठ्यांना विचारणा केली असता, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तहसील कार्यालयात पाठविली. आपली जबाबदारी आपण पार पाडली. मदत देण्याची जबाबदारी माझी नसून तहसील कार्यालयाची आहे. त्यामुळे मी काही करू शकत नाही, असे सांगितले. शेतकऱ्यांनी ऑक्टाेबर, २०१९ मध्ये झालेल्या नुकसानीची यादी पाहिली असता, ज्या लाेकांच्या नावाने शेती नाही, अशांनाही मदत मिळाल्याचे दिसून आले. यामध्ये मार्कंडादेव एकाच कुटुंबातील ४ व्यक्तींच्या नावावर बँकेत वेगवेगळ्या खात्यांवर मदत जमा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे नुकसान भरपाईच्या यादीत बराच घाेळ झाला असून, या प्रकरणाची चाैकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी विठ्ठल बाेरूले, भाऊराव हजारे, तुळशीराम हजारे, सुभाष काेतपल्लीवार, वनिता देशमुख, कृष्णा लांबाडे, ए.एस. झरकर, तुळशीदास चुधरी, याेगेश्वर चुधरी, सुभाष चुधरी, पांडुरंग हजारे यांनी केली आहे.
शेती नसलेल्यांनाही मिळाली अतिवृष्टीची भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:38 AM