गडचिराेली : पुण्यातील एका कंपनीने घरच्या घरी काेराेनाची रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यासाठी किट तयार केली असून, या किटच्या सहाय्याने घरच्या घरी काेराेनाची चाचणी करता येते. गडचिराेली जिल्ह्याच्या शहरी भागात सदर टेस्ट किट उपलब्ध आहेत. २३६ तर काही किट २५० रुपये दराने रुग्णांना विकली जात आहे.
किटच्या सहाय्याने घरच्या घरी काेराेनाचे ॲन्टीजन टेस्ट करण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे, तसेच औषध दुकानदारांनासुद्धा ही किट विक्रीसाठी परवानगी दिली आहे. संबंधित रुग्ण पाॅझिटिव्ह आल्यास त्याची तीव्रता किती? यानुसार गृहविलगीकरण किंवा थेट रुग्णालयात भरती केले जाते.
२५० रुपयांत किट
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान जिल्ह्यातील काही औषध दुकानांमध्ये काेराेनाची घरच्या घरी टेस्ट करण्यासाठीची किट उपलब्ध हाेती; मात्र ग्राहक न मिळाल्याने काही विक्रेत्यांनी त्या एजंसीकडे परत पाठविल्या. आता मागणी हाेऊ लागल्याने ते उपलब्ध करून देण्यावर भर आहे.
पाॅझिटिव्ह आल्यास नाेंदणी कशी?
सदर टेस्ट किटच्या पाऊचमध्ये आधीच भरलेली एक्स्ट्रॅक्शन ट्युब, नेझल स्वॅब, एक टेस्ट कार्ड आणि सेफ्टी बॅग असते. टेस्ट करणाऱ्या व्यक्तीला आपल्या फाेनमध्ये मायलॅब काेविसेल्फ ॲप डाऊनलाेड करावे लागते. पाॅझिटिव्ह येणाऱ्यास गृहविलगीकरण, आयसीएमआरचे नियम पाळणे आवश्यक आहे.
असा करावा किटचा वापर
नेझल स्वॅब नाकपुड्यांमध्ये २ ते ४ सेमी आतपर्यंत टाकावे. त्यानंतर नेझल स्वॅब नाकपुड्यांमध्ये पाचवेळा फिरवावे. उरलेला स्वॅब ताेडून टाकावा, त्यानंतर ट्युबचे झाकण बंद करावे. टेस्टकार्डवर ट्युब दाबून दाेन थेंब टाकावेत. चाचणी अहवालासाठी १५ मिनीट वाट पाहावी.
फारशी मागणी नाही
गडचिराेली शहरात अनेक माेठी औषध दुकाने आहेत. शिवाय मेडिकल एजंसी आहेत. घरच्या घरी रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यासाठीची किट काही दुकानांत उपलब्ध असली तरी त्याला फारशी मागणी नाही.
ही किट घेणाऱ्या रुग्णांचे नाव, त्याचा माेबाइल नंबर, संबंधित औषध विक्रेता नाेंदवून घेत आहे.