गडचिरोली- कोरची तालुक्यातील कोसालडाबरी येथील नीलकंठ मडावी (वय ५३) हे १२ मार्च रोजी गोंदिया जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियान पथकाच्या गोळीबारात जखमी झाले. नक्षलवादी समजून त्यांच्यावर गोळीबार झाला. मात्र, प्रत्यक्षात ते नक्षलवादी नसून गडचिरोली पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाचे वडील असल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोसालडाबरी, बोदालदंड व बोंडे येथील काही आदिवासी समाजातील लोक १२ मार्चला सकाळी शिकारीसाठी जंगलात गेले होते. त्याच दरम्यान गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मगरडोह पोलीस मदत केंद्राचे पोलीस सी-६० पथक गस्त करीत होते. शिकारीच्या शोधात फिरत असलेल्या त्या नागरिकांना नक्षलवादी समजून सी-६० पथकाने लागलीच त्यांच्यावर बंदुका रोखल्या आणि काही क्षणांत गोळीबारही केला. त्यात नीलकंठ मडावी यांच्या हाताला आणि छातीच्या बरगळीला गोळ्या लागल्या. गंभीर जखमी झालेल्या मडावी यांना गडचिरोलीवरून हेलिकॉप्टर बोलवून उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले.
दरम्यान, सोबतचे लोक गावाकडे परत आले आणि हळूहळू या घटनेला तोंड फुटू लागले. विशेष म्हणजे जखमी नीलकंठ मडावी हे गडचिरोली पोलिसांच्या कोटगूल पोलीस मदत केंद्रात कार्यरत पोलीस शिपाई विनोद मडावी यांचे वडील आहेत. त्यांनाही या घटनेने मोठा धक्का बसला आहे. नागपुरातील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भरती असलेल्या वडिलांना अद्याप आपण भेटू शकलो नाही. गावाकडील लोक अशिक्षित आहेत. ते लहानपणापासून शिकारीला जातात, पण ते नक्षलवादी नाहीत. ते निर्दोष आहेत, असे विनोद यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
हाती बंदुका दिसल्या आणि तिथेच घात झाला...जे लोक जंगलात गेले होते. ते शिकारीसोबत तेंदू पुडे बांधण्यासाठी वाक (विशिष्ट वनस्पतीची साल) आणायला जंगलात गेले होते. यावेळी दोन जणांकडे भरमार बंदुकाही होत्या. छोट्या प्राण्यांच्या शिकारीसाठी किंवा जंगलात प्राण्यांपासून रक्षणासाठी त्याचा वापर केला जातो. १२ मार्चला ते गावकरी आणि नक्षलविरोधी पथक (सी-६०) तिकडे एकाच वेळी पोहोचले. गावकऱ्यांच्या हातातील बंदूक पाहून ते नक्षलवादीच आहेत, असे समजून पोलिसांनी पोजिशन घेतली. पोलीस आपल्यावर बंदुका रोखत असल्याचे पाहून घाबरलेल्या गावकऱ्यांनी जागा मिळेल तिकडे पळण्यास सुरुवात केली. त्यात नीलकंठ मडावी हे पळू न शकल्यामुळे त्यांना पोलिसांच्या गोळीने लक्ष्य केले.
प्रकरणाचा तपास सुरू -पोलीस पथकाने गोळीबार केलेल्या त्या लोकांकडून दोन भरमार बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. संशयित नक्षलवादी समजून पथकाने त्यांच्यावर बंदुका रोखल्या होत्या. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासाअंतीच काय ते स्पष्ट होईल, असे गोंदियाचे पोलीस अधीक्षक, विश्व पानसरे यांनी सांगितले.