लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र शासनाने दुर्गम भागात टॉवर उभारण्यासाठी बीएसएनएलला निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून बीएसएनएल जिल्ह्यात सुमारे २२२ मोबाइल टॉवर उभारणार आहे. या सर्व टॉवरवर फोर- जी तंत्रज्ञान बसवले जाणार आहे. पूर्वीच्या तुलनेत टॉवरची संख्या दुप्पट होणार असल्याने कव्हरेजची समस्या दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मानवाच्या प्रगतीत इंटरनेट व मोबाइलचे विशेष स्थान आहे. त्यामुळे रस्त्याप्रमाणेच प्रत्येक गाव आता मोबाइलच्या कव्हरेजने जोडण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत केबल टाकून इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहे. या क्षेत्रात असलेली भविष्यातील कमाई लक्षात घेऊन बीएसएनएलसह खासगी कंपन्यांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. मात्र ही गुंतवणूक प्रामुख्याने शहराच्या भागात केली, त्यामुळे मोबाइलचे जाळे शहरात व जवळच्या मोठ्या गावात निर्माण झाले. मात्र दुर्गम व ग्रामीण भाग यापासून वंचित राहिला. या भागातील नागरिकांची क्रयशक्ती कमी असल्याने खासगी कंपन्याही या ठिकाणी टॉवर उभारण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे केंद्र शासनाने स्वतः पुढाकार घेत बीएसएनएलला टॉवर उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
जिल्ह्यात टॉवरचे काम आता सुरू झाले आहे. बऱ्याच ठिकाणी फाउंडेशनचे काम पूर्ण झाले आहे. ज्या टॉवरचे काम पूर्ण झाले आहे, त्या टॉवरवर यंत्रणा बसवली जाणार आहे. प्रत्येक मोठ्या गावाच्या ठिकाणी टॉवर होणार आहे. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातही कव्हरेज राहणार आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण व दुर्गम भागातील ग्राहकांसाठी चांगली सेवा मिळेल.
येथे होणार टॉवरतालुका टॉवरअहेरी २२आरमोरी ३भामरागड ११चामोर्शी १६देसाईगंज ४धानोरा ४७गडचिरोली २३कुरखेडा २१मुलचेरा ८कोरची ६सिरोंचा १६एटापल्ली ४५
केंद्र शासनाचे सहकार्यशहरात फाइव्ह-जी तंत्रज्ञान आणले जात असताना ग्रामीण व दुर्गम भागात अजूनपर्यंत टू-जी सेवासुद्धा पोहोचली नाही. या भागातील नागरिकांची क्रयशक्ती कमी असल्याने कंपन्या टॉवर निर्मिती करण्यास तयार होत नव्हत्या त्यामुळे केंद्र शासनाने स्वतः पुढाकार घेत BSNL सह इतर खासगी कंपन्यांना मोबाइल टॉवरसाठी निधी उपलब्ध केला आहे. टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे.
दुर्गम भागाला सर्वाधिक प्राधान्यगडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग नक्षलग्रस्त व जंगलाने व्यापला आहे. हा भाग मोबाइल सेवेपासून वंचित राहिला होता. त्यामुळे नव्याने टॉवर मंजूर करताना प्रामुख्याने दुर्गम भागांना प्राधान्य देण्यात आले आहे. प्रामुख्याने पोलिस मदत केंद्राच्या परिसरात टॉवर बांधण्यात आले आहेत.
केंद्र शासनाच्या मदतीने मोबाइल टॉवरचे बांधकाम केले जात आहे. प्रत्येक मोठ्या गावात आता टॉवर बांधले जात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील गावांमध्येही कव्हरेज पोहोचेल. टॉवरचे काम सुरू आहे. टॉवर बांधून पूर्ण होताच. त्याच्यावर फोर-जी तंत्रज्ञान बसवले जाईल.- किशोर कापगते, विभागीय अभियंता, बीएसएनएल