लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिरोंचा वन विभागांतर्गत कमलापूर वन परिक्षेत्रातील हत्ती कॅम्पमधील अवघ्या चार वर्षाचा आदित्य नावाचा हत्ती ११ जून रोजी चिखलात अडकल्याने तो गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ आहे. त्याने खाणेपिणे सोडून दिले असून वन विभागाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्याच्यावर उपचार सुरू केले आहे.१० जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कमलापूर परिसरात जोरदार पाऊस बरसला. पावसामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. आदित्य नावाचा हत्ती रात्री चिखलात फसून अडकून पडला. दरम्यान मासेमारीसाठी आलेल्या लोकांनी हत्ती चिखलात अडकून पडल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर सर्व महावतानी घटनास्थळी जाऊन अडकून पडलेल्या हत्तीला चिखलातून बाहेर काढले. तेव्हापासून आदित्य हा इतर सहकारी हत्तीसोबत राहत नाही. एकटाच अस्वस्थ स्थितीत राहत असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय त्याने खाणेपिणे सोडून दिले. त्यामुळे वनाधिकाऱ्यांनी पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून त्याच्यावर उपचार सुरू केले आहे.आदित्य हा ११ जून रोजी चिखलात अडकला होता. महावतानी त्याला बाहेर काढले. मात्र त्याने नऊ हत्तींसोबतची संगत सोडली असल्याने तो अस्वस्थ झाला आहे. अजुनही तो नेहमीप्रमाणे वावरत नसल्याने पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून आदित्यवर उपचार सुरू केले आहे. आतापर्यंत आदित्यला १२ सलाईन लावले असून औषधोपचार सुरू आहे. त्याची मानसिक अवस्था ढासळली आहे.- एस. एस. पवार, उपविभागीय वनाधिकारी, वन विभाग सिरोंचा
आता तर ‘आदित्य’ने खाणेपिणेही दिलेय सोडून...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 1:12 PM
अवघ्या चार वर्षाचा आदित्य नावाचा हत्ती ११ जून रोजी चिखलात अडकल्याने तो गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ आहे. त्याने खाणेपिणे सोडून दिले असून वन विभागाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्याच्यावर उपचार सुरू केले आहे.
ठळक मुद्दे११ जूनला अडकला होता तलावाच्या चिखलात