लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : सन २०२३-२०२४ च्या संचमान्यतेनुसार १० आणि १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील दोनपैकी एका रिक्त पदावर डी.एड., बी.एड. अर्हताधारक उमेदवारास तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षक पदावर नियुक्ती देण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने हालचाली वाढवल्या असून कंत्राटी शिक्षक भरतीसाठी डीएड, बीएडधारकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
२३ सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णय व शिक्षण सहसंचालक, शिक्षण आयुक्तालय. पुणे यांच्या ७ ऑक्टोबर रोजीच्या पत्रातील निर्देशानुसार सन २०२३-२०२४ च्या संचमान्यतेनुसार ज्या जि. प. शाळांची पटसंख्या १० आणि १० पेक्षा कमी आहे, अशा शाळेतील शिक्षकांच्या दोनपैकी एका रिक्त पदावर डी.एड., बी.एड. अर्हताधारक उमेदवारास तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षक पदावर नियुक्ती देण्यात येणार आहे.
सदर उमेदवाराची निवड करताना उमेदवार संबंधित शाळेच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स्थानिक रहिवासी असावा, असे निर्देश आहेत. त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक डीएड, बीएडधारक उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.
१० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत अगदी तात्पुरत्या स्वरूपात डी.एड., बी.एड. अर्हताधारक बेरोजगार पात्र व इच्छुक उमेदवारांना पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेचे प्रमाणपत्र व स्थानिक गावातील रहिवासी असल्याबाबतचे पुरावा दाखल दस्ताऐवजासह अर्ज सादर करण्याचे आव्हान जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेब पवार यांनी केले आहे.
२५० शाळांमध्ये येणार कंत्राटी शिक्षक जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात एकूण १४६४ शाळा आहेत. दरम्यान १० आणि १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या जवळपास २४६ इतकी आहे. या शाळा पेसा क्षेत्रातील व अवघड तसेच दुर्गम भागातील आहे.
येथे होणार शिक्षकांची नियुक्ती कमी पटसंख्येच्या शाळा आदिवासीबहुल भागात आहेत. यामध्ये अहेरी उपविभागातील पाच तालुके आणि उत्तर भागातील कोरची तालुक्यात कमी पटसंख्येच्या शाळा आहेत. अहेरी, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, सिरोंचा तसेच कोरची तालुक्यातील १० आणि १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
गुणवत्तेचे काय ?दुर्गम, अतिदुर्गम भागात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. कमी पटसंख्येच्या शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक नेमत असताना गुणवत्तेकडे लक्ष कोण देणार, असा प्रश्न शिक्षणप्रेमी नागरिकांतून उपस्थित होत आहे. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गुणवत्तेचे धोरण निश्चित करावे, अशी मागणी होत आहे.
"शासनाच्या निर्णयानुसार डी. एड., बी.एड. अर्हताधारक उमेदवारास तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षक पदावर नियुक्त्ती देण्यात येणार आहे. स्थानिक उमेदवारांना यात संधी असून डी. एड., बी.एड. अर्हताधारक बेरोजगारांनी १० ऑक्टोबरपर्यंत गटशिक्षणाधिकारी पंचायत समितीकडे अर्ज सादर करावे." - बाबासाहेब पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)