ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाची महत्त्वाची पायरी म्हणून पाहिले जाते. त्यामुळेच गावाची सत्ता आपल्याच हातात यावी किंवा आपल्या गटाची सत्ता असावी, अशी इच्छा गावातील अनेक प्रमुख लोकांची असते. त्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुका या पक्षविरहीत लढविल्या जातात. अनेक गावात प्रमुख्याने दोन तीन गट हे नेहमीसाठी असतात. याच गटाच्या आधारावर लोकसभा, विधानसभापासून तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आपापल्या गटाचा आधार घेऊन लढविल्या जातात. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी गावागावात राहतात. याच कार्यकर्त्यांच्या भरवशावर राजकीय पक्ष निवडणुका लढवित असतात. मात्र, इतर निवडणुकीत फारसे प्रभावी न दिसणारे गावातील गट मात्र, ग्रामपंचायत निवडणुका आल्या की, एकमेकाविरोधात कट्टर बनतात. गावातील गटबाजी उफाळून येते.
राजकीय पक्षापेक्षा गावातील गट हे पक्षविरहीत एकमेका विरोधात उभे राहतात जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या जाहीर झालेल्या निकालात यावेळी नवख्या तरुण उमेदवारांना मतदारांनी पसंती देऊन त्यांना ग्रामपंचायतमध्ये काम करण्याची मोठी संधी दिली आहे. त्यामुळे गावाच्या कारभाराची धुरा नवख्या उमेदवारांवर येऊन ठेपली आहे. तर जुन्या लोकांना माेठ्याप्रमाणात लोकांनी नाकारले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत बऱ्याचशा ग्रामपंचायतमध्ये पक्षविरहीत निवडणुका झाल्या. गावागावात दोन ते तीन पॅनल एकमेकविरोधात उभे ठाकले होते. गावखेड्यात बऱ्याच गावात एकाच पक्षाच्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे एकमेकांसोबत पटत नसल्याने स्वतःचे पॅनल काढून एकमेकविरोधात लढले तर काही गावात विरोधी पक्षाचे पदाधिकारी एकत्र येऊन निवडणूक लढले. अशाप्रकारे अनेक गमतीजमती असलेल्या निवडणुका झाल्या. आता निवडणुकीची मतमोजणी आटोपल्याने गावागावातील वातावरण थोडे-थोडे शांत झाले आहे. काही गावात पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले तर काही गावात वेगवेगळ्या पॅनलचे सदस्य निवडून आल्याने संमिश्र स्थिती निर्माण झाली आहे. सरपंचाच्या आरक्षणाची सोडत निघाल्यावर सत्तास्थापनेसाठी मोठी रस्सीखेच होणार आहे. ज्या गावात एखाद्या पॅनलला बहुमत मिळाले, त्या ठिकाणी परिस्थिती पाहिजे त्या प्रमाणात कठीण होणार नाही. मात्र वेगळ्या वेगळ्या पॅनलचे जे सदस्य म्हणून निवडून आले, त्या ठिकाणी मात्र मोठी रस्सीखेच होणार आहे, हे निश्चित.
अनेक प्रमुख पक्षांनी एकाच ग्रामपंचायतवर आपला दावा करीत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय पक्षामध्ये चढाओढ सुरू झाली आहे.
आता सरपंच पदाचे आरक्षण निघेपर्यंत आणि सत्ता स्थापणेपर्यंत हा खेळ असाच चालणार असून ग्रामपंचायतवर आपल्या पक्षाचे वर्चस्व निर्माण करण्याचा मानस व चढाओढ राजकीय पक्षांना लागली आहे.