धानोरा (गडचिरोली) : आदिवासींच्या धार्मिक कार्यात मोहाच्या दारूचा वापर आवश्यक समजला जातो. पण गावात दारू काढणेच बंद झाल्यास धार्मिक कार्य कसे पूर्ण होणार? नैवेद्य कशाचा देणार? असे प्रश्न अनेक ठिकाणचे गावकरी करतात. मात्र देवकार्यासाठी मोहफुलाची दारू नाही तर केवळ मोहफुले वापरली तरी चालते, असा स्पष्ट निर्वाळा गावपुजा-याने दिल्याने फासीटोला येथील ग्रामसभेत दारू काढणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच पद्धतीने इतरही गावांमध्ये असा निर्णय घेतला जाणार आहे.
मुक्तिपथ अभियानाच्या कार्यकर्त्यांकडून सध्या गावागावांत दारू आणि ख-र्याला आळा घालण्यासाठी जनजागृती केली जात आहे. पण देवकार्यासाठी दारू पाहीजेच असा गैरसमज पसरवत दारूविक्रेते आपल्या कृतीला पाठबळ मिळविण्याचा प्रयत्न करतात. यावर उपाय म्हणून गावपुजा-याने स्पष्टीकरण दिल्यास गावकरी नक्की ऐकतील हे लक्षात घेऊन मुक्तिपथ धानोरा तालुका चमूने फासीटोल्यात गावपुजारी मोतीरामजी हलामी यांना बोलवून ग्रामसभेत बसविले. पुजा-याने दारूऐवजी मोहफुल चालतात असे सांगितल्यानंतर या गावातील दारू काढणे बंद करण्याचा निर्णय झाला.
या परिसरातील आजूबाजूच्या गावांची दारूविक्री बंद झाल्यानंतर त्या गावातील दारुड्यांची वर्दळ फासीटोला येथे वाढली होती. त्यामुळे महिलावर्गही त्रस्त झाला होता. पुजारी हलामी यांनी आपण अनेक ठिकाणच्या देवकार्यात फक्त मोहफूल किंवा मोहाची साल पाण्यात बुडवून ते पाणी शिंपडून देवकार्य पूर्ण केले आहे, असेही सांगितले. त्यांनी स्वत:च्या परसवाडी या गावातील दारुबंदीचे उदाहरणही दिले. परिणामी दारुविक्रेत्यांना पुजा-याचे म्हणणे व ग्रामसभेचा ठराव मानणे भाग पडले.
दारू बनविण्याचे साहित्य केले नष्टग्रामसभेनंतर लोकांनी घरे तपासली असता काही ठिकाणी दारू सापडली. ती नालीत ओतण्यात आली. सर्वांनी मिळून दारूचे सडवे नष्ट करण्याचे ठरवले. यानुसार संपूर्ण गावातील सक्रीय कार्यकर्ते मिळून १० ते १५ किमीचा नदीकाठ, शेतशिवारातील दारूच्या भट्ट्या, तसेच सडव्यांची शोधमोहीम सुरू केली. नदी काठावर अनेक ठिकाणी मोहाचे सडवे व दारू बनवण्याचे साहित्य आढळून आले. हे सर्व साहित्य लोकांनी मिळून गावातील चौकात आणून नष्ट केले.