लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : एक जूनला शिथिल करण्यात आलेले निर्बंध कसेबसे २५ दिवस सुरू राहिले. आता काेराेनाच्या तिसऱ्या लाटेचा धाेका लक्षात घेऊन डेल्टामुळे राज्यात पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे वीकेंड हाॅटेलिंग पुन्हा बंद झाले आहे. तिसऱ्या लाटेचा धाेका निर्माण झाल्याने बाजारपेठेतील गर्दी राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आज, साेमवारपासून सायंकाळी चार वाजेनंतर जवळपास सर्वच व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात सद्य:स्थितीत काेराेनाची रुग्णसंख्या झपाट्याने कमी हाेत आहे. असे असतानाही बाजारपेठेतील गर्दी लक्षात घेता, काेराेनाची तिसरी लाट केव्हाही येऊ शकते. त्यामुळे आतापासून निर्बंध कडक करण्यात आले आहे. गडचिराेली शहरात धानाेरा, आरमाेरी मार्ग, काॅम्प्लेक्स परिसर तसेच इंदिरा गांधी चाैक व इतर सर्व ठिकाणची मिळून जवळपास २७ छाेटी-माेठी हाॅटेल आहेत. या हाॅटेलमध्ये भाेजनाची व्यवस्था आहे. काेराेनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यानही शासनाच्या निर्बंधानुसार हाॅटेल व्यवसाय अनेक महिने बंद राहिले. काही महिने केवळ पार्सल सेवा सुरू केली हाेती. आता शासनाच्या नव्या नियमानुसार गडचिराेली शहर व जिल्ह्यातील सर्व हाॅटेल सायंकाळी चार वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.
खरी उलाढाल हाेते सायंकाळलाच गडचिराेली जिल्ह्यात पाेलीस विभागात अनेक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. शिवाय सीआरपीएफ, एसआरपीएफ जवानही आहेत. तसेच विविध विभागातील जिल्ह्याच्या बाहेरील कर्मचारी आपल्या कुटुंबाला साेडून एकटेच ड्युटीच्या निमित्ताने गडचिराेलीत राहत आहेत. ते सुटीच्या दिवशी भाेजनालयात जाऊन खास भाेजनाचा आस्वाद घेण्यावर भर देत असतात. सायंकाळी व रात्रीच भाेजनासाठी हाॅटेलात गर्दी हाेत असते.
हाॅटेल व्यवसाय कधी उभा राहणार?
गेल्या दीड वर्षापासून हाॅटेल व्यवसाय डबघाईला आला आहे. काेराेना संकटामुळे या व्यवसायावर फार माेठा परिणाम झाला आहे. मध्यंतरी सुरू झालेला व्यवसाय काेराेनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पुन्हा बंद हाेण्याच्या मार्गावर आहे. परिणामी आम्हा हाॅटेल व्यावसायिकांचे नुकसान हाेत आहे. हाॅटेलसाठी सायंकाळचा वेळ द्यावा.- चंद्रकांत पतरंगे, हाॅटेल व्यावसायिक
काेराेनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दुपारी ४ वाजतानंतर हाॅटेल बंद ठेवावे लागणार आहे; पण यातून वीज बिल, भाडे, परवाना शुल्क भरून निघणे कठीण आहे. हाॅटेल व्यवसायावर अनेकांचा राेजगार अवलंबून आहे. हाॅटेल बंद पडल्यास त्यांचा राेजगार हिरावला जाईल. सरकारने मदत द्यावी.- राेशन कवाडकर, हाॅटेल व्यावसायिक
- साेमवारपासून ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत ५० टक्के डायनिंग क्षमतेसह रेस्टारंट, उपहार गृह व हाॅटेल सुरू ठेवण्याची मुभा असेल. त्यानंतर इतर वेळेस पार्सल/हाेम डिलिव्हरी सुरू ठेवता येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी काढलेल्या नव्या आदेशात नमूद आहे.- काेविडबाबत गडचिराेली जिल्ह्यात स्टेज ३ नुसार जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी नवीन आदेश जारी केले. प्रतिबंधात्मक उपाययाेजनेंतर्गत २८ जूनपासून निर्बंध लागू केले आहे.
हाॅटेल कर्मचाऱ्यांचे तर आणखी हाल
काेराेना संकाटामुळे पाच ते सहा महिने हाॅटेल बंद राहिल्याने आमचा राेजगार गेला. औषधाेपचार व बराच खर्च महिन्याला करावा लागताे. लाॅकडाऊनमुळे हाॅटेल बंद राहत असल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली. राहण्याचे खाेलीभाडे थकीत राहिले. तिन ते चार महिने गावाकडे राहून दिवस काढावे लागले.- विनाेद रायपुरे, कामगार
हाॅटेल व्यवसाय हा अत्यंत महत्वाचा आणि दरराेज गाेरगरीबांच्या गरजेचा म्हणून ओळखला जाताे. या व्यवसायातून अनेकांना राेजगार मिळताे. परंतु गेल्या दीड वर्षापासून काेराेनाने कहर केला आहे. त्यामुळे हाॅटेल व्यवसायावर आर्थिक संक्रांत आली आहे. सरकारने किमान घरपाेच सेवा सुरू ठेवल्याने थाेडी मदत हाेईल. कामगारांना आर्थिक मदत देण्याची मागणी आहे.- संदीप काेटांगले, कामगार