कर्तव्यात कसूर : दुसऱ्याला कामावरून काढण्याचे आदेश गडचिरोली : धुलीवंदनाच्या दिवशी १३ मार्चला सोमवारी स्थानिक नगर पालिका कार्यालयातील १०१ क्रमांकाच्या दूरध्वनीवर एकही कर्मचारी हजर नव्हता. परिणामी अपघातातील जखमीला संबंधित ठिकाणी पोहोचविण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना पालिकेची रुग्णवाहिका सेवा देणे शक्य झाले नाही. त्यामुळे कर्तव्यात कसूर केलेल्या एका स्थायी कर्मचाऱ्याची एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी केली. तसेच दुसऱ्या अस्थायी कर्मचाऱ्याला कामावर न घेण्याचे आदेश संबंधित विभागप्रमुखाला दिले. यासंदर्भाचे लेखी आदेश मुख्याधिकाऱ्यांनी बुधवारी काढले. नागरिकांना अग्निशमन व रुग्णवाहिका सेवेचा लाभ देण्यासाठी नगर पालिका कार्यालयात १०१ हा दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आला आहे. धुलीवंदनाच्या दिवशी सोमवारला सार्वजनिक सुटी असली तरी सदर अत्यावश्यक सेवा ही २४ तास सुरू असते. त्या दिवशी अग्निशमन यंत्राच्या वाहनावर चालक म्हणून सातपुते यांची ड्यूटी होती. तसेच रुग्णवाहिकेच्या सेवेवर मानधन तत्वावरील वाहनचालक म्हणून उमेश संगीडवार यांची ड्यूटी होती. मात्र त्या दिवशी सदर दोन्ही वाहनचालक कर्तव्यावर हजर नव्हते. दरम्यान अपघातातील एका जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका आवश्यक होती. संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी नगरसेवक संजय मेश्राम यांच्याशी संपर्क साधला. नगरसेवक मेश्राम यांनी वारंवार १०१ क्रमांकावर संपर्क साधला असता, तेथे कर्मचारी हजर नव्हते. दूरध्वनीला प्रतिसाद मिळाला नाही. तसेच काही वेळानंतर फोन पूर्णत: बंद दाखवित होता. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता मुख्याधिकारी निपाने हे स्वत: कार्यालयात येऊन पाहिले असता, १०१ क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवेवर एकही कर्मचारी उपस्थित दिसून आला नाही. त्यामुळे रुग्णवाहिका गरजू नागरिकांना पाठविण्यात आली नाही. शासकीय कामात निष्काळजीपणा, बेजबाबदारी तसेच कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आल्याने वाहनचालक उमेश संगीडवार यांना पुढील आदेशापर्यंत कामावर घेऊ नये, असे आदेश मुख्याधिकारी निपाने यांनी काढले असून सदर आदेशाची प्रत त्यांनी पालिकेचे स्वच्छता निरीक्षक डी. डी. संतोषवार यांना पाठविले आहे. तसेच स्थायी वाहनचालक सातपुते यांची एक वेतनवाढ कायमची बंद करण्याचे आदेशही मुख्याधिकाऱ्यांनी काढले असून सातपुते याला नोटीस बजावली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
न.प. कर्मचाऱ्याची वेतनवाढ रोखली
By admin | Published: March 16, 2017 1:11 AM