- मनोज ताजने गडचिरोली : अंगणवाड्यांमधून पोषण आहार मिळणाऱ्या ६ वर्षांपर्यंतच्या बालकांची संख्या १ जुलैपासून अचानक घटली आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या हाती आलेले ‘स्मार्ट फोन’ कारणीभूत ठरले आहेत. प्रत्यक्षात लाभार्थी पूर्वी होते तेवढेच आहेत, पण बोगस लाभार्थी दाखवून आहाराचे अनुदान लाटण्याच्या प्रकाराला स्मार्ट फोनमधील विशेष फिचरमुळे ब्रेक लागला आहे.आतापर्यंत रजिस्टरवर नमूद केलेल्या सर्व लाभार्थींना आहार पुरविल्याचे दाखविले जात होते. पण आता लाभार्थी मुलगा अंगणवाडीत आला का, आणि त्याला आहार देण्यात आला का याची दैनंदिन माहिती स्मार्ट फोनवरून महिला व बालविकास विभागाला द्यावी लागत आहे. त्या माहितीची खात्री करण्यासाठी बालकाच्या पालकाला फोनही केला जात आहे. त्यामुळे अंगणवाड्यांमधील बोगस लाभार्थींना ब्रेक लागला आहे. यातून आहार पुरवठ्यातील गडबडही नियंत्रणात येत आहे.बालकांसह दुर्गम भागात गरोदर व स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींनाही पोषण आहार देण्याची केंद्र व राज्य सरकारची योजना आहे. राज्यभरात असलेल्या अंगणवाड्यांच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून वेगवेगळा आहार दिला जातो. त्या आहार पुरवठ्याची जबाबदारी शासनाने नेमलेल्या वेगवेगळ्या एजन्सींकडे असली तरी त्यांची नोंद ठेवून बिल मंजूर करण्याचे काम तालुकास्तरावरील बालविकास प्रकल्प अधिकारी करतात. आतापर्यंत अनेक अंगणवाड्यांमध्ये रजिस्टरवर बोगस लाभार्थी दाखविले जात होते. त्यांच्या नावावर आहार पुरविल्याचे दाखवून जास्त पैसे लाटले जात होते. मात्र आता दैनंदिन आहार वाटपाची माहिती अॅपमधून भरणे सक्तीचे करण्यात आले आहे.>दुर्गम भागात अजूनही बोगसपणाला वावगडचिरोली जिल्ह्याच्या बहुतांश दुर्गम भागात मोबाईल व इंटरनेटचे पुरेसे कव्हरेज नाही. अशा स्थितीत अंगणवाडी सेविकांना दिलेल्या स्मार्ट फोनवरून दैनंदिन माहिती अपडेट करणे अशक्य झाले आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास या जिल्ह्यात आहार पुरवठ्यातील गडबड दूर होऊ शकणार नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्हा मोबाईल नेटवर्कच्या कक्षेत येण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती व्यवस्था करण्याची गरज आहे.
‘स्मार्ट फोन’ने घटली बोगस लाभार्थींची संख्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 5:34 AM