लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यात सर्वाधिक काळ कोरोनामुक्त राहिलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्या महिनाभरात कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आतापर्यंत २३८ जणांना कोरोनाने ग्रासले. मात्र त्यापैकी १८७ जणांची नोंद गडचिरोलीतील रुग्ण म्हणून करण्यात आली असून बाकी रुग्णांची नोंद त्यांच्या मूळ जिल्ह्यात व राज्यात करण्यात आली आहे. एकूण बाधित रुग्णांमध्ये तब्बल ११६ जण नक्षलविरोधी अभियानासाठी बाहेरून आलेल्या सुरक्षा दलांचे जवान आहेत.मंगळवारी (दि.१४) राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) ४२ जवानांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले.गेल्या आठवड्यात १५० एसआरपीएफ जवानांची तुकडी धुळे येथून गडचिरोलीत आल्यानंतर जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या परिसरात ते सर्व जवान संस्थात्मक विलगिकरणात होते. उर्वरित जवानांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) विविध बटालियनचे जवान गेल्या महिनाभरात सुट्यांवरून जिल्ह्यात परत आले आहेत. ते सर्व वेगवेगळ्या ठिकाणी संस्थात्मक विलगिकरणात होते. त्यापैकी आतापर्यंत ७२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय सीमा सुरक्षा दलाचे २ जवान पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यात दाखल झालेल्या विविध सुरक्षा दलाच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११६ झाली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ एका रुग्णाचा हैदराबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तो हृदयरोगी होता. याशिवाय ९० जणांनी कोरोनावर मात केली असून उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.