गडचिरोली : सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देणारा हंगाम असलेल्या तेंदूपत्ता संकलनाला ओळखले जाते. तेंदूपत्ता संकलनासाठी दरवर्षीच्या तुलनेत दिवसेंदिवस परजिल्ह्यातील मजुरांची संख्या मोठय़ा प्रमाणात घटत आहे. गडचिरोली जिल्ह्यात उत्कृष्ठ दर्जाचा तेंदूपत्ता मिळतो. त्यामुळे येथील तेंदूत्त्याला राष्ट्रीय स्तरावर चांगला भाव मिळत असल्याने विविध राज्यातील तेंदूपत्ता कंत्राटदार तेंदूपत्ता संकलनाचे कंत्राट घेतात. यापासून वनविभागालासुध्दा कोट्यवधी रूपयाचा महसूल प्राप्त होतो. तेंदूपत्ता जास्त संकलन होण्यावरच कंत्राटदाराचा नफा अवलंबून असल्याने कंत्राटदार जास्तीत जास्त मजूर आणून तेंदूपत्ता संकलन करण्याचा प्रयत्न करतात. काही वर्षापूर्वी नजीकच्या चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व छत्तीसगड राज्यातील मजूर आणून तेंदूपत्ता संकलन केले जात होते. कंत्राटदाराला कंत्राट मिळाल्याबरोबर दिवाणजीच्या मदतीने मजुरांची यादी बनविली जात होती. एवढेच नाही तर कंत्राटदार स्वत:चे वाहन पाठवून मजुरांना तेंदूपत्ता संकलनाच्या जागी घेऊन जात होता. मजुरांना तेंदूपत्ता संकलन करण्यापूर्वीच काही पैसे आगावू देत होता. उन्हाळ्यात शेतीची कामे राहात नसल्याने ग्रामीण भागातील मजुरही तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात जात होते. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या सावली, ब्रम्हपूरी, गोंडपिपरी या तालुक्यातील बहुसंख्य नागरिक तेंदूपत्ता संकलनासाठी जात असल्याने ही गावे ओसाड पडत होती. एवढेच नाही तर लग्न विधी, बारसे व इतर कार्यक्रमे तेंदूपत्ता संकलनाच्या पूर्वीच आटोपून घेतली जात होती. आता परिस्थिती मात्र पूर्णपणे बदलली आहे. शेतकर्यांनी शेतामध्ये विहिर, बोअरवेल खोदले आहे. या साधनांच्या मदतीने भाजीपाल्याची पिके उन्हाळ्यातही घेत आहेत. बर्याच भागामध्ये उन्हाळ्यामध्ये रोजगार हमी योजनेची कामे सुरू राहत असल्याने दीडशे ते दोनशे रूपयापर्यंतची मजुरी गावातच मिळत आहे. त्यामुळे तेंदूपत्ता संकलनाला जाण्याची गरज राहिली नाही. ग्रामीण भागामध्ये असलेला तरूण वर्ग उन्हाळ्यामध्ये शहरात जाऊन कारखान्यामध्ये काम करण्याला पसंती देत आहे. शासनाने अन्न सुरक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला महिन्याकाठी ५ किलो राशन उपलब्ध करून देत आहे. या सर्व बाबींमुळे तेंदूपत्ता संकलनाला येण्यास बाहेर जिल्ह्यातील नागरिक तयार होत नाही. तेंदूपत्ता संकलनादरम्यान तेंदूची झाडे तोडत असल्याचा नक्षल्यांचा आरोप असल्याने कधीकधी नक्षली तेंदूपत्ता संकलनास विरोध करतात. नक्षली कारवायांच्या बातम्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून दुसर्या जिल्ह्यातील नागरिक वाचत असल्याने चार पैसे न मिळालेले बरे मात्र जीव गमाविणार नाही, असा विचार नागरिक करीत असल्याने तेंदूपत्ता संकलनाला येण्यास तयार होत नाही.
तेंदूपत्ता मजुरांची संख्या घटली
By admin | Published: May 27, 2014 11:43 PM