लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : ओबीसींना घटनादत्त अधिकार मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम घेतले होते. मात्र तत्कालीन स्थितीत त्यांना समजून घेण्यात कमी पडलेला ओबीसी समाज आणि तत्कालीन शासनाने ओबीसी बांधवांकडे फिरवलेली पाठ, त्याचेच परिणाम आजही भोगावे लागत आहेत. मात्र ओबीसी बांधवांना त्यांच्या हक्कांप्रमाणे न्याय मिळावा, असे आपले मत असून ओबीसींना घटनादत्त अधिकार मिळवून देणे हे आपले ध्येय आहे, असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी केले. देसाईगंज येथील सिधू भवनात भाजपा ओबीसी मोर्चा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद कृषी सभापती नाना नाकाडे, सभापती मोहन गायकवाड, न. प. उपाध्यक्ष मोतिलाल कुकरेजा, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ठेंगरी, रोशनी पारधी, भाजपचे जेष्ठ नेते किशन नागदेवे, प्रशांत वाघरे, सदानंद कुथे उपस्थित होते.आ. गजबे पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडबिलाच्य माध्यमातून ओबीसी बांधवांच्या भविष्यकालीन समस्या लक्षात घेऊन या समाजाला तत्कालीन स्थितीतच यथोचित न्याय मिळवून देण्याचा कसोशीने प्रयत्न केला होता. मात्र ओबीसी बांधवांच्या आरक्षण संदर्भात मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आज अखेर संघर्ष पेटू लागला असून आपल्या यथोचित न्याय हक्कासाठी ओबीसी बांधवांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. विद्यमान शासनाने स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची निर्मिती करुन ओबीसींना यथोचित न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याची सुरुवातही जिल्हा पातळीवर ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृह बांधकामास गती देण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. तालुक्यातील भारनियमन, इटिया डोह नहराच्या पाण्याचा प्रश्न, या समस्या मांडण्यात आल्या. आ. गजबे यांनी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून इतरांवर अन्याय होऊ देणार नाही, याची ग्वाही दिली. संचालन विष्णू दुनेदार, प्रास्तविक प्रशांत वाघरे यांनी तर आभार सुनील पारधी यांनी मानले.
ओबीसींना हक्काप्रमाणे न्याय मिळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 1:00 AM
ओबीसींना घटनादत्त अधिकार मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम घेतले होते. मात्र तत्कालीन स्थितीत त्यांना समजून घेण्यात कमी पडलेला ओबीसी समाज आणि तत्कालीन शासनाने ओबीसी बांधवांकडे फिरवलेली पाठ, त्याचेच परिणाम आजही भोगावे लागत आहेत.
ठळक मुद्देआमदारांचे प्रतिपादन : देसाईगंज येथे भाजप ओबीसी कार्यकर्त्यांचा मेळावा