गडचिरोली : येथील गोकुलनगरात नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी नियमितपणे कचरा उचलण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे परिणामी वाॅर्डामध्ये बहुतांश ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. या ठिकाणचा कचरा उचलला जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत नगर परिषदेकडे अनेकवेळा तक्रार करूनही स्वच्छता राखण्याबाबत दखल घेतली जात नाही.
तहसीलमध्ये पदे रिक्त
गडचिरोली : स्थानिक तहसील कार्यालयात लिपिक वर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र, पदे रिक्त असल्याने सदर योजना राबविताना अडचण निर्माण होत आहे.
पाण्याचा अपव्यय सुरूच
गडचिरोली : स्थानिक नगर पालिका क्षेत्रात खूप जुनी नळ पाईपलाईन टाकण्यात आली आहे. त्यामुळे शहराच्या सखल भागातील नळ पाणीपुरवठा दिवसभर सुरू असतो. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जाते. सखल भागात अनेक ठिकाणी वॉल्व्ह बसविण्याची गरज आहे. मात्र, नगर परिषद याकडे दुर्लक्ष करीत आहे.
अतिक्रमणामुळे अडथळा
गडचिरोली : रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण करण्यात आले आहे. सदर टपऱ्या लहान आहेत. मात्र, दिवसा त्यापुढेही विस्तार करून वस्तू ठेवल्या जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. नागरिकांच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.
सामान्य रुग्णालयातील लिफ्ट सुरू करा
गडचिरोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिफ्ट मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. लिफ्टची व्यवस्था केल्यानंतर केवळ दोन ते तीन दिवस लिफ्ट सुरू होती. त्यानंतर लिफ्ट बंद करण्यात आली. लिफ्ट सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र, मागणीची दखल घेतली जात नाही.
बाजारात स्वच्छतागृह द्या
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौक शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरात कुठेही जाण्यासाठी इंदिरा गांधी चौकातूनच मार्गक्रमण करावे लागते. अनेक नागरिक चौक परिसरात विसावा घेतात. नागरिकांना मुतारीसाठी नाहक त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी स्वच्छतागृह निर्माण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
भामरागड तालुक्यातील गावांना विजेची प्रतीक्षा
भामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यातील अनेक गावांत विजेचे खांब उभे करण्यात आले. त्यावर ताराही ओढण्यात आल्या. मात्र, यावर वीज पुरवठा सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे या भागातील नागरिक अद्यापही विजेच्या प्रतीक्षेत आहेत.
कोरचीतील रस्ते खड्डेमय
कोरची : तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावर गवत उगवले आहे. गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी आहे. खड्ड्यांमुळे अपघात हाेण्याची शक्यता बळावली आहे.
दत्त मंदिर दुर्लक्षित
आरमोरी : तालुक्यातील रामपूर चक येथे प्राचीन काळापासून दत्ताचे मंदिर आहे. या मंदिरात शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. परंतु, मंदिराच्या विकासाकडे दुर्लक्ष असून, मंदिर विकासापासून अजूनही वंचितच आहे. येथे सुविधा देण्याची मागणी भाविकांकडून हाेत आहे.
शिधापत्रिका मिळेना
कुरखेडा : जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना शिधापत्रिका मिळाली नसल्याने अजूनही ते वंचित आहेत. तहसील कार्यालयात परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज केल्यानंतरही तालुक्यातील एपीएल नागरिकांना शिधापत्रिका देण्यात आल्या नाहीत. अर्ज केल्यानंतरही अनेक महिने नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागते.
प्रत्येक तालुक्याला अग्निशमन यंत्रणा द्या
गडचिरोली : दहा लाख लोकसंख्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुक्यांमध्ये १६४८ गावे आहेत. आगीच्या घटनांवेळी मदतीला धावून जाणारे केवळ चार अग्निशमन वाहन जिल्ह्यात आहेत. प्रत्येक तहसीलला अग्निशमन यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
रांगी मार्गावर झुडपे
आरमोरी : लोहारा ते रांगी, पिसेवडधा ते रांगी या मागार्वर अनेक झाडे रस्त्यावर आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना अडचण येते. वन विभागाने या झाडांची तोड करावी, अशी मागणी आहे. मोठे वाहन आल्यास रस्त्याच्या बाजूच्या झुडपांमुळे दुचाकी वाहनधारकांना अडचण निर्माण होते.
भूखंड देण्याची मागणी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कैकाडी व तत्सम भटक्या, विमुक्त जमाती आढळून येतात. या जमातीतील शेकडो नागरिकांचा दारिद्र्यरेषेमध्ये समावेश आहे. त्यांना भूखंड देण्याची मागणी आहे.
शाैचालयांची दुरवस्था
आष्टी : शासकीय कार्यालयांच्या शौचालयात फार मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. या शौचालयांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. शौचालयांची स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. नागरिकांना घर बांधकामासाठी भूखंड व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.