गडचिरोली : शहरात विविध भागात घराचे बांधकाम सुरू असून, बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवत आहेत. लोखंडी सळाक तोडण्याचे कामही रस्त्यावरच करण्यात येते, शिवाय रस्त्यावरच विटा, रेती, गिट्टी, सळाक आदी साहित्य ही ठेवले आहे. मात्र, याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
दुर्गम भागात कर्मचारी राहत नाही
धानोरा : धानोरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील, तसेच आरमोरी, देसाईगंज, कोरची व कुरखेडा तालुक्याच्या दुर्गम भागात कार्यरत व दररोज अपडाऊन करत आहेत. हे कर्मचारी दुर्गम भागात राहत नसल्यामुळे ते कार्यालयात नियमित हजर राहात नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील कार्यालये ओस पडत आहेत.
निस्तार डेपो अभावी नागरिक त्रस्त
कुरखेडा : अनेक गावांमध्ये निस्तार डेपो नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने, गावात निस्तार डेपो देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. मात्र, कुरखेडा येथे निस्तार डेपो नाही.
आरमोरीत सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधा
आरमोरी : शहरात सार्वजनिक मुत्रीघर नसल्याने जनतेने स्वत:हून काही ठिकाणी अघोषित मुत्रीघर तयार केली आहेत. त्यामुळे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधणे आवश्यक आहे.
बीएसएनएलचे टॉवर वाढविण्याची मागणी
आष्टी : दुर्गम भागात बीएसएनएलचे अत्यंत कमी टॉवर आहेत. त्यामुळे या परिसरातील भ्रमणध्वनींना कव्हरेज मिळत नाही. बीएसएनएलचे जिल्ह्यात सर्वाधिक ग्राहक असून, जास्तीत जास्त टॉवर उभारण्याची मागणी होत आहे.
शौचालयांची स्वच्छता करा
देसाईगंज : शासकीय कार्यालयांच्या शौचालयात फार मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. या शौचालयांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करा
गडचिरोली : खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी आहे.
सुसाट दुचाकी धारकांवर कारवाई करा
अहेरी : दुचाकीच्या कर्कश आवाजामुळे शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वार भरधाव वेगाने वाहन चालवीत असल्याने वाहनांचा कर्कश आवाज ऐकावा लागत असल्याचे दिसून येते.