देसाईगंज (गडचिरोली) : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत देसाईगंज शहरातील बहुप्रतीक्षित बसस्थानकाचे १९ सप्टेंबर २०१९ ला महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांनी भूमिपूजन केले. भूमिपूजनाला तीन वर्षांचा कालावधी लोटला तरी प्रत्यक्ष इमारत बांधकामाला सुरुवात झाली नाही. ज्या ठिकाणी भूमिपूजन करून भूमिपूजनाचा फलक लावण्यात आली होता तो फलकच गायब झाला आहे. या ठिकाणी अतिक्रमण झाले असतानाही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष हाेत आहे.
एसटीने ६ हजार १२० चौरस मीटर जागा शासकीय दराने १ कोटी २४ लाख २३ हजार रुपये एवढी रक्कम शासनाकडे भरून ३ नोव्हेंबर २०१८ ला अधिग्रहित केली. तालुका भूमी अभिलेख कार्यालय देसाईगंज यांच्याकडून मोजणी करून सीमांकन निश्चित करण्यात आले. तहसीलदार देसाईगंज यांनी २९ नोव्हेंबर २०१८ ला ताबादेखील दिलेला आहे.
फाइल मंत्रालयात पडून?
बसस्थानकाची इमारत बांधकामासाठी ३६ कोटी २३ लाख रुपये एवढ्या किमतीचे अंदाजपत्रक तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी मंत्रालयात फाइल पाठविली असल्याचे सांगितले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने भूमिपूजन केलेल्या जागेवरचा भूमिपूजनाचा बोर्ड मोक्का स्थळावरून गायब आहे.
नागपूर विभागीय कार्यालयातून निविदा प्रक्रिया पार पाडून अंतिम मंजुरीसाठी आमच्या कार्यालयाकडे फाइल आली आहे. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडे स्वाक्षरीसाठी ठेवलेली आहे. मात्र, याला आणखीन काही कालावधी लागू शकतो, असे विभागीय अभियंता एच.एस. खामकर यांनी सांगितले.