लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सरकारी नोकरी म्हणजे ‘सरकारचा जावई’ असे उपहासाने म्हटले जाते. अनेक सरकारी कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे आणि त्यांच्या वागणुकीला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दलची प्रतिमा खराब होते. आता त्यात मोबाइलची भर पडली आहे. सरकारी कार्यालयात वावरताना मोबाइलचा वापर कसा, किती प्रमाणात करावा, याची आचारसंहिता आहे, पण अनेक वर्ग १ दर्जाच्या अधिकाऱ्यांनाच याबद्दल माहीत नाही, तर कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी कोणता आदर्श ठेवावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘लोकमत’ने काही सरकारी कार्यालयांत केलेल्या पाहणीत अनेक कर्मचारी खासगी कॉलमध्ये बराच वेळ व्यस्त राहत असल्याचे दिसून आले. त्यांची ही कृती कर्मचाऱ्यांच्या आचारसंहितेचा भंग ठरत आहे.
काय आहे आचारसंहिता
कार्यालयीन कामासाठी केवळ कार्यालयीन दूरध्वनीचा वापर करावा. कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक तेव्हाच माेबाइलचा वापर करावा. माेबाईलवर साैम्य आवाजात बाेलावे. वाद घालू नये. कार्यालयीन कामासाठी माेबाइलचा वापर करताना टेक्स्ट मेसेजचा वापर करावा. माेबाइलवर आलेले अत्यावश्यक वैयक्तिक काॅल बाहेर जाऊन घ्यावेत.
जिल्हाधिकारी कार्यालयजिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर विस्तीर्ण आहे. त्या ठिकाणी चहा घेण्यासाठी जायचे म्हटले तरी किमान १५ मिनिटे जातात; पण त्याशिवाय अनेक वेळा कर्मचारी आपल्या खासगी कॉलवर सविस्तर बोलण्यासाठी बाहेर जात असल्याचे दिसून आले. हे करताना त्यांना वेळेचे भान राहत नसल्याचे दिसले. यात सरकारी ड्यूटीतील महत्त्वाचा वेळ वाया जातो.
कामगार अधिकारी कार्यालयकॉम्प्लेक्समध्ये असलेल्या जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयात आधीच कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यातही एक कर्मचारी मोबाइलवर बोलत बोलत बाहेर येऊन बसला. बोलणे थोडे लांबले; पण खासगी कॉलवर बोलताना किती वेळ द्यावा याबाबतच्या सूचना कोणत्याच कर्मचाऱ्यांना कधी दिल्या गेल्या नाहीत.
सरकारी कार्यालय नको रे बाबा
अनेक सरकारी कार्यालयांत बाबू लोक जागेवर सापडतच नाहीत. सापडले तर ते लगेच काम करतील असेही नाही. आमच्यामागे काम खूप आहे, असे त्यांचे नेहमीचे वाक्य असते; पण मोबाइलवर बोलत बसायला त्यांच्याकडे वेळ असतो. - प्रकाश चौधरी
सरकारी कार्यालयांमध्ये पदे रिक्त असल्यामुळे आता कर्मचाऱ्यांची कामे वाढली आहेत. त्यामुळे कामांना वेळ लागणे साहजिकच आहे; पण खासगी कार्यालयांच्या तुलनेत त्यांचे काम कितीतरी कमी आहे. त्यांनी मोबाइलवर कॉल, व्हॉट्सॲप चॅटिंग जरा कमी करावे.- प्रमोद पाथोडे
कार्यालयाचे अधिकारी म्हणतात....
कर्मचाऱ्यांसाठी काय आचारसंहिता आहे याबद्दल आस्थापना विभागाच्या तहसीलदारांना विचारा. कर्मचारी मोबाइलवर बोलत असतील तर काय बिघडले? प्रत्येकाला बोलावेच लागते. कर्मचारी मोबाइलवर खासगीच बोलत असेल हे कशावरून? त्यांचे संभाषण सरकारी कामाबद्दलही असू शकते. त्यामुळे त्यांना याबद्दल समज देण्याची गरज नाही.- जी.एम. तळपाडेनिवासी उपजिल्हाधिकारी