ऑनलाइन लोकमत
भामरागड, दि. १० - पर्लकोटा नदीजवळ वसलेल्या भामरागड या तालुकास्थळावरील शहरात पाणी शिरले असून ३०० पेक्षा अधिक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. शहरातील घरांमध्ये पाच फुटापेक्षाही अधिक पाणी साचले आहे. जीवनोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
भामरागड तालुक्यात मागील २४ तासात अतिवृष्टी झाली असून या तालुक्यात सुमारे ३०० मिमी पाऊस पडल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागाने केली आहे. दुसºया दिवशीही गडचिरोली जिल्ह्यातील दीडशेवर अधिक गावांचा संपर्क तुटलेलाच आहे.
भामरागड हा घनदाट जंगलाने व्यापलेला तालुका आहे. या तालुक्यामधून इंद्रावती, पर्लकोटा, पामुलगौतम या तीन मुख्य नद्या आहेत. या तिन्ही नद्यांनी भामरागड शहराला वेढले आहे. भामरागड हे शहर पर्लकोटा नदीजवळ वसले आहे. पर्लकोटा नदीने शनिवारीच धोक्याची पातळी ओलांडली होती. शनिवारी दिवसभर पर्लकोटा नदी पुलावरून दोन फूट पाणी वाहत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होती.
मात्र शनिवारच्या रात्री भामरागड तालुक्यात अतिवृष्टी झाली. सुमारे ३०० मिमी पाऊस पडला. परिणामी पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढली व शनिवारी रात्रीच्या सुमारास भामरागड शहरामध्ये पाणी शिरले. या शहरातील विश्वेश्वराव चौकात पाच फुटापेक्षा अधिक पाणी साचले आहे.
पर्लकोटा नदी पुलावरूनही पाच फूट पाणी वाहत आहे. वीज, फोन आदी सुविधा बंद असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने आपत्ती व्यवस्थापन विभाग आधीच सज्ज झाला होता. शहरातील नागरिकांना आधीच सुरक्षितस्थळी हलविण्याने मोठा धोका टळला आहे. भामरागड तालुक्यात अजुनही अतिवृष्टी सुरूच असल्याने पूर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता प्रशासनातील अधिका-यांनी व्यक्त केली आहे.