गडचिराेली : कठाणी नदीसह अनेक ठिकाणी नवीन उंच पूल बांधले आहेत. जुने व ठेंगणे पूल सुध्दा कायम आहेत. या पुलांना दरवाजे बसवल्यास बॅरेजप्रमाणे नदीत काही किलाेमीटर अंतरावर पाणी साचून राहिल. यामुळे सिंचनाची सुविधा वाढून उत्पादन वाढण्यास मदत हाेईल.
पाणी टक्यांना कुंपण करण्याची गरज
गडचिरोली : पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गावांमध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु या टाकीच्या सुरक्षेसाठी प्रशासन गंभीर नसल्याचे दिसते. प्रत्येक पाणी टाकीला कुंपण करून पाणी टाकीच्या क्षेत्रात प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.
विटा बनविण्याच्या कामास वेग
देसाईगंज : देसाईगंज तालुक्यात मोठ्या प्रमाणात विटांची निर्मिती केली जाते. विटांची मागणी वाढली असल्याने विटा बनविण्याच्या कामास वेग आला आहे. अनेकांना येथून राेजगार मिळाला आहे. पुन्हा चार महिने विटा व्यवसाय चालणार आहे.
देलाेडा-सूर्यडाेंगरी मार्ग उखडला
वडधा : देलाेडा-सूर्यडाेंगरी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गाने आवागमण करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरूस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
वाहनधारकांवर कारवाई करा
आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालवली जात आहेत. मात्र याकडे वाहतुक पोलीसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नाक्यावर पुरेशा कर्मचाऱ्यांचा अभाव
गडचिरोली : तालुक्यातील नाक्यावर केवळ अपुरे कर्मचारी तैनात आहेत. या कर्मचाऱ्यांना सतत तीन पाळीमध्ये आपली जबाबदारी निभवावी लागत आहे. एका कर्मचाऱ्याला किमान १६ तास काम करावे लागत आहे. त्यामुळे नाक्यावरील कर्मचारी त्रस्त आहेत.
ग्रामीण भागात जळाऊ लाकडांचा तुटवडा
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ७६ टक्के क्षेत्रावर जंगल आहे. मात्र स्थानिक नागरिकांना वन विभाग सरपणासाठी लाकूड उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे बहुतांश डेपोंवर जळाऊ लाकडांचा तुटवडा आहे. जंगलातून वाळले लाकुड आणल्यास वन विभाग कारवाई करते. त्यामुळे जळाऊ लाकडे बिटात उपलब्ध करावी, अशी मागणी होत आहे.
शहरातील नाल्यांमध्ये फवारणीची मागणी
सिरोंचा : येथील अनेक वॉर्डातील डासांमुळे शहरात आजाराचे प्रमाण वाढले असून अनेक घरी लोक तापाने फणफणत आहेत. सर्दी, पडसेसह अन्य आजार वाढले आहेत. त्यामुळे नाल्यांचा उपसा करून सर्वच वार्डातील नाल्यांमध्ये फवारणी करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.
कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करा
आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा.
मोकाट जनावरांमुळे रहदारी बाधित
आष्टी : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभे राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून वाहन धारकांना नेहमी अपघाताची भीती असते. अनेक मार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
ग्रामीण भागात वीज चोरीच्या प्रमाणात वाढ
गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे. मात्र वीज चोरीचा भुर्दंड इतर नागरिकांना सहन करावा लागत आहे.
कोरचीतील अनेक शाळा विजेविनाच
कोरची : शासनाच्या आग्रहानंतर शाळांनी डिजिटल साधने खरेदी केले आहेत. मात्र शाळेमध्ये वीज पुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळखात पडून आहेत. काही शाळांना वीज पुरवठा होता. मात्र वीज बिल भरला नसल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे आता संबंधित शाळा विजेविनाच सुरू आहेत.
सिकलसेल संशोधन केंद्र स्थापन करा
एटापल्ली : जिल्ह्यात सिकलसेल वाहक रूग्णांची संख्या १० ते १२ हजारांवर आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्यात सिकलसेलचे प्रमाण जास्त असल्याने सिकलसेल संशोधन केंद्र स्थापन करावे, अशी मागणी होत आहे.