लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : काेराेनामुळे महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरविण्यास प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी ५० नागरिकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार महाशिवरात्रीनिमित्त विधिवत पूजन केले जाईल, अशी माहिती मार्कंडा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेला ट्रस्टचे सचिव मृत्युंजय गायकवाड, सहसचिव रामूजी तिवाडे व कर्मचारी उपस्थित होते. पुढे माहिती देताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, मार्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने २८ फेब्रुवारीला मूल येथील सतुभैया नर्सिगदास सारडा यांच्या हस्ते गंगापूजनास सुरुवात होणार आहे. ०१ मार्च रोजी पहाटे ०४ वाजता शंकर महादेवाच्या शिवलिंग पिंडीची विधिवत महापूजा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे. यावेळी देवस्थान ट्रस्टचे निमंत्रक खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी उपस्थित राहणार आहेत. पंकज पांडे, शुभांगी पांडे हे सपत्नीक पूजेचे यजमान राहणार आहेत. दर्शन रांगेमध्ये पहिला वारकरी असलेल्या भाविकांचा शाल व श्रीफळ देऊन देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात येणार आहे. ०२ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता परंपरेनुसार व्याहाड येथील मारोती पाटील म्हशाखेत्री यांचे हस्ते टिपूर पूजन (दिवा लावणे) हाेईल. ०४ मार्च रोजी मार्कंडेश्वराची समारोपीय महापूजा. जि.प. सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार, पत्नी साधना गण्यारपवार यांच्या हस्ते करण्यात येईल. सकाळी १०.३० वाजता मार्कंडेश्वराची शोभायात्रा पालखी काढण्यात येईल. भक्तांना भोजनदान केले जाणार आहे.दर्शनार्थी भाविकांना ऊन, पावसापासून संरक्षण करण्यासाठी तात्पुरता कापडी मंडप उभारण्यात येणार आहे. पाण्याची सुविधा, भाविकांना अल्प विश्रांतीसाठी तात्पुरते भक्त निवास व्यवस्था, महाप्रसाद वितरण मंडप व सूचना फलक ध्वनिक्षेपक राहील, अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
काेराेनाचे नियम पाळले जाणार- जिल्हा प्रशासनाने मार्कंडादेव जत्रेला परवानगी नाकारली असली तरी भाविकांची गर्दी हाेण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने मार्कंडादेव ट्रस्टने तयारी केली आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला काेराेना बाबतचे नियम पाळणे सक्तीचे केले जाणार आहे.