१ जानेवारीपासून अंमलबजावणी : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठकगडचिरोली : केंद्र शासनाच्या निर्णयानुसार मॉडिफाईड बेनिफिट ट्रान्सर्फर फॉर एलपीजी कस्टमरस योजना १ जानेवारी २०१५ पासून लागू होणार आहे. या योजनेंतर्गत पुन्हा गॅसधारकांची गॅस सबसिडी बँक खात्यात जमा होणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. चांदुरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला इंडियन आॅईल कार्पोरेशन चंद्रपूरचे प्रबंधक डी. डी. पौनीकर, भारत पेट्रोलियम कार्पोरेशनचे सहाय्यक प्रबंधक ऋषीकेश माहिनकर, हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशनचे वरिष्ठ सेल्स आॅफीसर रमेश कुमार, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रतिनिधी ए. डी. आंबिलधुके, गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी, वडसा, कुरखेडा येथील गॅस एजन्सीचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. ज्या गॅस ग्राहकांकडे आधारकार्ड उपलब्ध नाही, अशा ग्राहकांनी राष्ट्रीयकृत बँक खात्याशी आॅनलाईन गॅस ग्राहक क्रमांक जोडावे, गडचिरोली जिल्ह्याकरिता येथील दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. ज्या ग्राहकांना बँकेचे खाते गॅस क्रमांकाशी जोडावयाचे आहे, तसेच ज्यांचे खाते नाहीत त्यांनी नव्याने बँकेत खाते उघडून सदर बँक खाता क्रमांक गॅस क्रमांकाशी जोडावा, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. आधारकार्डाविनाही ही सबसिडी बँक खात्यात जमा होईल, अशी माहितीही या बैठकीत देण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात यूपीए सरकारच्या काळात ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ग्राहकांना या योजनेची चांगली माहिती आहे. मात्र काहींच्या योजनेतील सबसिडी उशीरा जमा होते, याबाबत तक्रारीही होत्या. आता पुन्हा ही योजना भाजप सरकारच्या काळात नव्या वर्षापासून सुरू होणार असल्याने प्रशासन यादृष्टीने कामाला लागले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
पुन्हा गॅस सबसिडी बँक खात्यावर जमा होणार
By admin | Published: November 12, 2014 10:42 PM