अहेरी : तालुक्यातील काेकापल्ली येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागताे. दिवसेंदिवस हा त्रास वाढत हाेता. ही समस्या लक्षात घेऊन नागरिकांनी पाेलिसांच्या सहकार्याने ८०० मीटर लांबीचा रस्ता श्रमदानातून दुरुस्त केला.
राजाराम उपपाेलीस स्टेशन अंतर्गत काेकापल्ली हे गाव येते. गावात १५० च्या आसपास लाेकसंख्या आहे. राजाराम खांदला येथे ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागत हाेता. विद्यार्थी, महिला, शेतकऱ्यांना रस्त्याअभावी अनेक अडचणींना ताेंड द्यावे लागत हाेते. ही बाब राजाराम उपपाेलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पाेलीस निरीक्षक रवींद्र भाेरे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी नागरिकांना एकत्रित केले. पाेलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने नागरिकांनी श्रमदानातून एक किमी रस्त्यावर दगड व मुरुम टाकून कच्चा रस्ता तयार केला. पाेलिसांच्या सहकार्याने रस्ता तयार करण्यात आला. या उपक्रमासाठी अहेरीचे उपविभागीय पाेलीस अधिकारी बजरंग देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.
बाॅक्स
अनेक गावात जाण्यासाठी पायवाटेचाच आधार
अहेरी तालुक्यातील अनेक गावात जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. पायवाटेनेचे गावात जावे लागते. पावसाळ्यात नागरिकांना चिखल तुडवत वाट काढावी लागते. शासन-प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या भागात साेयीसुविधा अद्यापही पाेहाेचल्या नाहीत. विशेष म्हणजे, याेजनांबाबत दुर्गम भागात जागृती नाही. त्यामुळे नागरिकांना अद्यापही हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. ज्या रस्त्याचे बांधकाम दहा वर्षांपूर्वी करण्यात आले. त्या रस्त्यांचे खडीकरण झाले नाही, अशी गंभीर स्थिती आहे.