लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : येथील ब्रह्मपुरी मार्गावरील नदीघाटावरच्या नाकाबंदी पॉईंटवर आरमोरी पोलिसांनी मंगळवारच्या पहाटे एका चारचाकी वाहनातून होणारी दारू तस्करी हाणून पाडली. त्या वाहनातील एक लाख रुपयांची दारू आणि चार लाख रुपये किमतीचे वाहन, असा एकूण ५ लाखांचा ऐवज जप्त करून दोन जणांना अटक केली. प्राप्त माहितीनुसार, पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्यासह त्यांच्या पथकातील रवींद्र चौके, नरेश वासेकर, शैलेश तोरपकवार, एकनाथ ढोरे, देवराव केळझरकर हे आरमोरी शहरात रात्रगस्त पेट्रोलिंग करून वैनगंगा नदीघाटाच्या नाकाबंदी पाॅईंटवर आले. त्या ठिकाणी वाहनांची तपासणी करत असताना पहाटेच्या सुमारास नागपूर, ब्रह्मपुरीकडून आरमोरीकडे येणाऱ्या एका चारचाकी (झायलो वाहन, क्रमांक एमएच ०३, बीएस-७५०२) वाहनाला अडविण्यात आले. त्या वाहनाची तपासणी केली असता, त्यात एक लाख दोन हजार रुपये किमतीच्या ९० मिलीच्या देशी दारूच्या सीलबंद निप आढळून आल्या. त्यावर रॉकेट प्रवरा डिस्टिलरी, प्रवरानगर असे लेबल होते, मात्र ते फाडलेल्या अवस्थेत होते. यावेळी सूरज नामदेवराव बगमारे (३२ वर्षे, रा. बोंडेगाव) याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून एक मोबाईल जप्त करण्यात आला. त्याच्यासह दुसरा आरोपी राहुल प्रकाश मैद (३० वर्षे, रा. ब्रह्मपुरी याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली. पुढील तपास उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे करीत आहेत.