गडचिरोली : तालुक्यातील अलोणी- बोदली दरम्यान असलेल्या नाल्यालगत आठ ठिकाणी टाकलेला १ लाख रुपये किंमतीचा मोहसडवा व साहित्य गडचिरोली पोलिस व मुक्तिपथने संयुक्तरित्या नष्ट केला आहे. एक्शन प्लॅननुसार गावांतील दारूविक्रेत्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
अलोणी या गावात दारूचा महापूर आहे. अलोणीत ३० ते ४० दारूविक्रेते सक्रिय आहेत. या गावाच्या माध्यमातून तालुक्यातील बोदली,जेप्रा, जेप्रा चक, राजगाटा माल, राजगटा चक, उसेगाव व जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या गडचिरोली शहरात सुद्धा दारू पुरविल्या जाते. यामुळे परिसरातील अनेक गावे त्रस्त झाली आहेत. झगडे-भांडणांचे प्रमाण अधिक झाले आहे. याबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. गडचिरोली पोलीस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या अलोणी येथील जंगलपरिसरात अहिंसक कृती करण्याचे ठरविले. त्यानुसार जंगलपरिसरात शोधमोहीम राबवत असतांना अलोणी- बोदली दरम्यान असलेल्या नाल्यालगत आठ ठिकाणी ३० ड्रममध्ये मोहसडवा टाकला असल्याचे निदर्शनास आले. असा एकूण १ लाख रुपये किंमतीचा मोहसडवा व साहित्य नष्ट करण्यात आले.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या आदेशाने ऍक्शन प्लॅननुसार तालुक्यातील अवैध दारूविक्रेत्यांविरोधात मोहीम सुरु आहे. दारूविक्रेत्यांविरोधात गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे तालुक्यातील दारूविक्रेते धास्तावले आहेत. ही कारवाई गडचिरोलीचे ठाणेदार दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रमेश उसेंडी, यशवंत मलगाम, मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकूडकर, तालुका उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केली.
फोटो ओळ : मोहसडवा नष्ट करताना पोलीस व मुक्तिपथ चमू