सोईसुविधा उपलब्ध : विद्यार्थ्यांचा कल वाढतीवर लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायाच्या प्रशिक्षण सत्रास प्रवेश देण्याच्या आॅनलाईन प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून शहरी भागासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा याकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे आॅनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अडचणी येतात. त्यामुळे प्रत्येक तालुकास्तरावरील शासकीय आयटीआय मध्ये विद्यार्थ्यांचे आॅनलाईन प्रवेश अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हास्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मुलांकरिता एक व दोन वर्षीय अभ्यासक्रम तसेच मुलींकरिता विशेष अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आले आहेत. आदीवासी उमेदवारांकरिता ७५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्रवेशित अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता मुलां- मुलींकरिता स्वतंत्र गृह, आय.टी.लॅब, दृकश्राव्य खोली, निर्वाह भत्ता आदी सुविधा मिळणार आहेत, असे प्राचार्य के.एम.विसाळे यांनी कळविले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आॅनलाईन प्रवेश
By admin | Published: June 22, 2017 1:35 AM