गडचिराेली : यंदाचे शैैक्षणिक सत्र २८ जून, २०२१ पासून सुरू झाले असले, तरी काेराेना संसर्ग व डेल्टाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सलग दुसऱ्याही दिवशी विद्यार्थ्यांना ऑनलाइन एज्युकेशनवरच अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक पालकांचा साधारणत: ४० ते ५० हजार रुपयांचा खर्च वाढला आहे. त्यात ऑनलाइन शिक्षणाचा फारसा फायदा हाेत नसून, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती मंदावत असल्याचे अनेक पालकांकडून सांगितले जात आहे.
काेविड १९च्या प्रकाेपामुळे गडचिराेली जिल्ह्यातील सर्वसामान्य पालकांचे आर्थिक नियाेजन काेसळले आहे. एकीकडे आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये, असे त्यांना वाटते, तर दुसरीकडे आर्थिक बाबतीत ताे हतबल आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे संगणक किंवा स्मार्ट फाेन, टॅबलेेट अत्यावश्यक आहे. गाेरगरीब पालकांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. कसेबसे करून माेबाइल घेतला, तरी दर महिन्याला इंटरनेटचा खर्च करावा लागत आहे, शिवाय अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके आणि वह्याही घ्याव्या लागत असल्याने, ऑफलाइन शिक्षणापेक्षा ऑनलाइन शिक्षणाने पालकांचे कंबरडे माेडल्याचे दिसून येत आहे.